विहे :
गेल्या दोन महिन्यापासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसातही कराड-पाटण तालुक्यातील गावोगावासह वाड्यावस्तीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांत स्टेज उभारणी, पत्रे बांधणीसह डेकोरेशन मंडप घालण्याची गडबड दिसत आहे. दोन दिवसावर गणेशाचे आगमन राहिल्यामुळे कुंभारवाड्यातही मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची तर मंडळांच्या कार्यकर्त्यांची डेकोरेशनसह लहान-मोठे साहित्य गोळा करण्याची गडबड सुरू असल्याचे चित्र खेडोपाडी दिसत आहे.
ऑगस्टपासूनच वाड्यावस्तीवरील लहान-मोठ्या सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची गणपती व दुगदिवी बसविण्याबाबत हालचाल दिसत होत्या. बैठका, वर्गणी पुस्तके छापून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे. मागील बाकी बाबत चर्चा होऊन चालूवर्षी गणेश उत्सव पाऊसकाळ जारत असल्याने पावसाचे विघ्न निर्माण झाले असले तरी गावोगावी मंडळांची परंपरा टिकविण्याची धडपड दिसत आहे. सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनाचे नियोजन सुरू आहे. गणपतीचे आगमन जवळ येत चालल्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सव साजरा करण्याची गडबड चित्र दिसत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून स्टेजला लागणारे पत्रे गोळा करून बांधणीसह स्टेजसमोरील मंडप, डेकोरेशन उभारणीचे काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या चार दिवसापासून गावोगावी मंडळाजवळ सकाळी व रात्री उशीरपर्यंत तरुण कार्यकर्ते स्टेजची साफ करणे, स्पिकर दुरूस्ती, गावातील पत्रे गोळा करून स्टेजच्या बाजूने बांधण्याची गडबड दिसत आहे. शाळा सुटल्यानंतर बालगोपाळांची भर त्यात पडल्यामुळे मंडळे बोलकी होत आहेत.
गावोगावी मोठ्या सार्वजनिक मंडळासह गल्ली-बोळात लहान मुले एकत्र येऊन उत्सवासाठी स्टेज तयार करताना दिसत आहेत. मंडळांनी ठराविक उंचीची आकर्षक मूर्ती जवळच्या कुंभारवाड्यात सांगितली आहे. दिवसातून किमान दोन-चार फेऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या कुंभारवाड्याकडे होत असल्याचे चित्र आहे. जसजसे गणेश मूर्तीचे रंगकाम पुढे पुढे सरकत आहे तसे तसे तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी कुंभारवाड्यात दिसत आहे. कुंभार वाड्यातल्या हातांचा वेग वाढला असून प्रत्येक हाताला दिवसभर विश्रांती मिळकत नाही. मोठ्या मंडळांच्या गणपतीवर अंतिम हात मारण्याचे काम सुरू आहे. मंडळांच्या उंचच्या उंच विविध रंगांनी नटलेल्या मूर्ती कुंभारवाड्याचे आकर्षण ठरले आहेत. कुंभारवाड्यात अनेक मंडळांच्या नावाच्या पाट्या गणरायाच्या गळ्यात दिसत आहेत. महागाईमुळे गतवर्षर्षीपेक्षा थोड्याफार किंमती वाढल्याचे कुंभारवाड्यातून सांगण्यात येत आहे.
- रात्रंदिवस काम सुरू
गेल्या पंधरा दिवसापासून स्टेज, भराव, पत्रे, डेकोरेशन साहित्यासह कार्यकर्त्यांची गडबड सुरू असून दोन दिवस राहिल्यामुळे कामे पूर्ण करण्याची गडबड सुरू आहे. कार्यकर्ते रात्रीचा दिवस करत आहेत.
-नितीन यादव, शेडगेवाडी
- कुंभारवाड्यात गडबड
ठराविक मंडळांची मूर्तीची ऑर्डर असते. घरगुती गणपतीही द्यावे लागतात. शाडू मातीची मूर्ती परवडणारी नाही. तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती स्वस्त व मस्त होत असल्यामुळे कामही उरकत आहे. मात्र मजुरांचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वांना काम करावे लागते. मंडळाचे कार्यकर्ते येतात, त्यांच्या पसंतीचा रंग द्यावा लागतो. दोन दिवस बाकी असल्यामुळे गडबड सुरू आहे.
-राजेंद्र कुंभार, विहे








