एसपीजी, पोलिसांकडून शोधमोहीम-तपास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थान परिसरातून सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ड्रोनने उ•ाण केल्याची माहिती मिळाली. एसपीजीने दिल्ली पोलिसांना यासंबंधी माहिती दिल्यानंतर ‘नो फ्लाईंग झोन’मध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच या प्रकरणाची एसपीजीनेही चौकशी सुरू केली आहे.
दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानावर एक ‘अज्ञात उडणारी वस्तू’ (ड्रोन) दिसल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांना अद्याप काहीही संशयास्पद सापडलेले नाही. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोनसारखी वस्तू उडताना दिसल्याचा पीसीआर कॉल आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नो फ्लाय झोनमध्ये ड्रोन उडत असल्याच्या वृत्तानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याप्रकरणी एसपीजी सक्रिय झाली आहे. पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे (एटीसी) ड्रोनच्या संशयास्पद उ•ाणासंबंधी काहीही माहिती मिळाली नाही. मात्र, पोलीस या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
पंतप्रधान निवास संकुलाचे अधिकृत नाव पंचवटी आहे. हे क्षेत्र 4.9 हेक्टरमध्ये (12 एकर) पसरलेले असून 1980 च्या दशकात लुटियन्स दिल्ली येथे बांधलेले पाच बंगले आहेत. यामध्ये पंतप्रधान कार्यालय, रेसिडेन्सी झोनचा समावेश आहे. पीएम निवासाची सुरक्षा स्पेशल प्रोटेक्शन गार्ड (एसपीजी) द्वारे केली जाते. 5 बंगले असूनही त्यांना एकत्रितपणे 7, लोककल्याण मार्ग असे संबोधले जाते. सप्टेंबर 2016 मध्ये रस्त्याचे नामांतर झाले होते.









