होन्निहाळजवळ शेतवडीत मृतदेह आढळला
बेळगाव : सांबरा विमानतळाच्या भिंतीजवळ एका अज्ञात युवकाचा खून करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी खुनाची घटना उघडकीस आली असून विटांनी डोक्यावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. होन्निहाळजवळील खासगी जमिनीत सुमारे 20 ते 30 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रविवारी मध्यरात्रीनंतर हा खून झाला असावा, असा संशय आहे.
गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व विधीविज्ञान प्रयोगशाळेतील तज्ञांना पाचारण करण्यात आले. खून झालेल्या युवकाच्या खिशात एका वाहनाची चावी आढळून आली आहे. हा युवक कोण? त्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचा तपास करण्यात येत आहे. होन्निहाळ येथील आण्णाप्पा व्हरकेरी यांच्या शेतजमिनीत मृतदेह आढळून आला आहे. विमानतळ परिसरातील भिंतीजवळ ही घटना घडली आहे. सिमेंटच्या विटांनी डोक्यावर हल्ला करून त्याचा खून केल्याचा संशय आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी 9480804111 या क्रमांकावर मारिहाळ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या गूढ खुनाने एकच खळबळ माजली आहे.









