समितीच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर करून प्रचारकार्याला सुरुवात : भाजपचे इच्छुक नेते तणावाखाली
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने मुरलीधर गणपतराव पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर समिती कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत सुलभ व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. समितीच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर करून प्रचारकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. समितीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. काँग्रेसने आमदार अंजली निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर जेडीएसने नासीर बागवान यांची उमेदवारी घोषित केली आहे. समितीने मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. मात्र भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. इच्छुकांमध्ये माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, डॉ. सोनाली सरनोबत, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई हे इच्छूक भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. सर्वांनीच आपापल्या परीने उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या सर्वच इच्छुकांनी गेल्या पंधरा दिवसात दिल्ली आणि बेंगळुरात तळ ठोकून होते. सर्वच इच्छूक आता टेन्शन मोडमध्ये गेलेले आहेत. काही समाजमाध्यमावरुन तसेच प्रसारमाध्यमावरुन भाजपची उमेदवारी घोषित झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तर इच्छुकांचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाल्याच्या घोषणा करत आहेत. त्यामुळे भाजपमधील इच्छुक सध्या तणावाखाली वावरत आहेत.
गेल्या काही निवडणुकीत समितीचा उमेदवार निवडताना वेगवेगळे प्रसंग निर्माण झाले होते. उमेदवारी निवडीवरुन समितीत फूट पडून बंडखोरीही झाल्याच्या घटना आहेत. मात्र यावेळी सातपैकी तीन इच्छुकांनी स्वत:च माघार घेतली. उर्वरित चारपैकी एकाची मतदानाद्वारे अधिकृत उमेदवार म्हणून मुरलीधर पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी इच्छुक उमेदवारांनीही या निवडीचे खुल्या दिल्याने स्वागत करून समितीच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी जाहीर केले. तालुक्यात सध्या समितीला पोषक वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात समितीचा आमदार नसल्याने मराठी भाषिकांना अनुभव आलेला आहे. यासाठी समितीचा आमदार रहावा, अशी अपेक्षा मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षापासून समितीत असलेल्या दुहीमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. मात्र गेल्या सहा महिन्यापूर्वी समितीत एकी झाल्याने मराठी भाषिकांतून तसेच कार्यकर्त्यांतून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समितीचा उमेदवारही निवडीनंतर सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अन्य इच्छुकांनीही समितीच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले आहे. समितीचा उमेदवार यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर घोषित करण्यात येत होता. मात्र यावेळी लवकर निर्णय घेतल्याने समितीकडे प्रचारासाठी मुबलक वेळ आहे. यासाठी समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व कार्यकारिणी सदस्यांनी योग्य नियोजन केल्यास यावेळी समितीचा भगवा झेंडा निश्चितच फडकणार यात शंका नाही. मात्र तालुक्यात राष्ट्रीय पक्षानी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले असून यात काँग्रेस व भाजपने मराठी भाषिकांत आघाडी घेतली आहे. भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा आळवून युवा कार्यकर्त्यांना भाजपकडे ओढले आहे. त्यामुळे मराठी बाहूल भागात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
समिती उमेदवारासमोर राष्ट्रीय पक्षांचे आव्हान
तालुक्यात काँग्रेस आमदार असल्याने नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. जेडीएसने मराठी भाषिकांत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे समितीसमोर या तिन्ही राष्ट्रीय पक्षांचे आव्हान आहे. यासाठी समितीने सूत्रबद्धरितीने सीमाप्रश्नाचा मुद्दा तसेच मराठी भाषेवर होणारे आक्रमण, मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, सरकारी कार्यालयात मराठी भाषिकांना होत असलेला त्रास याचा प्रचारात योग्यरीतीने वापर केल्यास निश्चितच समितीला पूरक होणार आहे.









