सोने-चांदीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने खरेदीसाठी गर्दी : धनत्रयोदशीला खरेदी तेजीत
बेळगाव : सोने-चांदीसह विविध उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन यांच्या खरेदीने बेळगावकरांच्या पाडव्याचा गोडवा वृद्धिंगत झाला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त शहर बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी खरेदी झाली. सर्वच ठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली होती. तथापि, ढगाळ वातावरणामुळे उत्साहावर आणि खरेदीवरही काहीशी मर्यादा आली. वर्षभरातला हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्या निमित्ताने नवीन वस्तूंची, दागिन्यांची, वस्त्रप्रावरणांची, वाहनांची खरेदी होते. चांगल्या कामाचे मुहूर्त पाडव्याचे औचित्य साधून केले जातात. त्यामुळे प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांनी नवीन प्रकल्पांचा शुभारंभ केला. काही जणांनी आपल्या आस्थापनांचे उद्घाटन केले. त्यामुळे त्यांच्यासाठी पाडवा हा आनंददायी ठरला. याचप्रमाणे वस्त्रप्रावरणांच्या दुकानांतही गर्दीचा ओघ कायम होता. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बुकिंग आधीच झाले होते. त्याचप्रमाणे वाहनांचेही आगाऊ बुकिंग केलेल्या मंडळींनी पाडव्यादिवशी गाडी खरेदीचा मुहूर्त साधला. तरुणाईने मोबाईल घेणे अधिक पसंत केले. त्यामुळे मोबाईल शोरूम्समध्ये तरुणाईची गर्दी अधिक होती.
पावसामुळे थोडी निराशा
बेळगावमध्ये पाडव्याला खरेदी ठरलेलीच. याशिवाय गोव्याचे ग्राहकही बेळगावला येतात. परंतु, संध्याकाळी खरेदी करण्याच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या ग्राहकांच्या आनंदावर पावसाने विरजण घातले. त्यामुळे खरेदी काही प्रमाणात मंदावली. तथापि, धनत्रयोदशीला खरेदी तेजीत झाल्याने व्यापारीवर्गाला त्याचे फारसे काही जाणवले नाही.
गुंतवणुकीच्यादृष्टीने सोने खरेदी
पाडवा म्हणजे सोने-चांदी खरेदी ठरलेली. मात्र, यंदा पाडव्यापेक्षा धनत्रयोदशीदिवशी सोने चांदी खरेदी अधिक झाल्याचे पोतदार ज्युवेलर्सनी सांगितले. सोन्याच्या दरातील चढ-उतार लक्षात घेता चोख सोने घेण्यावर यंदा अधिक भर होता. दागिन्यांऐवजी सोन्याचे वळे किंवा नाणे खरेदीवर भर देण्यात आला. आज सोने हे गुंतवणुकीचे माध्यम झाल्याने लोकांनी गुंतवणुकीच्यादृष्टीने सोने खरेदी केले. हे सोने देऊन दागिने घडविण्याची पूर्वीची परंपरा नव्याने पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या पद्धतीच्या दागिन्यांनाही मागणी वाढली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. चांदीच्या दरातही वाढ झाली. 1 लाख 87 हजार प्रतिकिलो हा चांदीचा दर होता. तो कदाचित पुन्हा वाढूही शकतो. आश्चर्य म्हणजे मार्केटमध्ये मागणीनुसार चांदी उपलब्ध नाही. ज्यांनी पूर्वनियोजन करून चांदी खरेदी केली होती, त्यांच्यासाठी पाडवा अधिक शुभदायी ठरला.
– पोतदार ज्युवेलर्स
प्लॉट, नवीन वास्तू खरेदीकडे कल
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तूंची खरेदी करण्याची प्रथा आहे. लहान वस्तूंपासून ते मोठ्या वाहनांपर्यंत खरेदी केली जाते. बुधवारी दिवसभर खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला. शहरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. गृहोपयोगी वस्तूंसह कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र यंदा खुली जागा, तयार एनए प्लॉट, दुकानांसाठी जागा किंवा गाळे, नवीन वास्तू आदी खरेदीकडे लोकांचा कल होता. गेल्यावर्षीपेक्षा यंदा अनेक जणांनी विचारपूस केल्याचे बिल्डर युवराज हुलजी यांनी सांगितले.
– बिल्डर युवराज हुलजी
रिअल इस्टेट क्षेत्रालाही मिळाली पुन्हा भरारी
मागील वर्षी रिअल इस्टेट व्यवसायाला काहीशी मरगळ आली होती. मात्र यंदा रिअल इस्टेट क्षेत्रालाही अच्छे दिन आल्याचे दिसून आले आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त अनेक इच्छुकांनी खुले प्लॉट, तयार प्लॉट, दुकान गाळे, नवीन वास्तू बांधकाम कामांचा शुभारंभ तसेच नवीन घरांचा ताबा दिवाळी पाडव्याचा मुहूर्तावर घेतला आहे. तसेच काही जणांनी नवीन घरांचे बुकिंगही केल्याचे पाहावयास मिळाले. यंदा नव्या फ्लॅटसाठी मोठ्या प्रमाणात विचारपूस करण्यात आली. बेळगावमध्ये शेकडो अपार्टमेंट्समध्ये पाडव्यादिवशी लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याने रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा भरारी आल्याचे चित्र दिसून आले, असे बिल्डर आनंद अकनोजी यांनी सांगितले.
– बिल्डर आनंद अकनोजी
जीएसटी कमी झाल्याने वाहनांचे दरही कमी
गेल्या वर्षी दुचाकी वाहन खरेदीला थोडासा थंडा प्रतिसाद मिळाला होता. मात्र यंदा जीएसटी कमी झाल्याने गेल्यावर्षीपेक्षा 60 टक्के वाहन खरेदी वृद्धिंगत झाली असून परिणामी वाहनांचा स्टॉक उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहकांना वाहनांविना माघारी फिरावे लागले. त्यावरून यंदा वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेल्यावर्षीपेक्षा मोठी उलाढाल झाली आहे. यंदा जीएसटी कमी झाल्याने वाहनांचे दरही कमी झाले आहेत. याचा लाभ घेत ग्राहकांनी विविध मॉडेलची दुचाकी वाहने खरेदी केली. ग्राहकांच्या आनंदातच आमचा आनंद आहे, असे रोहित देशपांडे यांनी सांगितले.
– रोहित देशपांडे
वस्त्रप्रावरणे खरेदीकडे ग्राहकांचा ओढा
यंदा कापड उद्योगही तेजीत असून उलाढालही मोठी झाली आहे. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील ग्राहक कपडे खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र होते. मात्र महिलांचा ओढा साडी खरेदी करण्याकडे होता. एकंदरीत यंदा ग्राहकांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले. सूरत, कांजीवरम्, धर्मावरम्, बेंगळूर व बनारस आदींना अधिक मागणी होती. विविध प्रकारच्या साड्या खरेदीकडे महिलांचा कल होता. यंदा मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा ओढा असल्याने आम्हीही आनंदी आहोत, असे संतोष वाधवा यांनी सांगितले.
– संतोष वाधवा
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी
जीएसटी कमी झाल्याने पाडव्याच्या शुभमुहुर्तावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आदी वस्तूंना अधिक मागणी होती. गेल्यावर्षीही बऱ्यापैकी उलाढाल झाली होती. मात्र यंदा जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच फायनान्सची झिरो पेमेंट सुविधा देण्यात आल्याने वस्तू पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी थेट वस्तूंची खरेदी केली. गेल्या आठ दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी नागरिक गर्दी करत होते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून ग्राहकांनी गर्दी करून खरेदी केल्याचे पंकज रेवणकर यांनी सांगितले.
– पंकज रेवणकर
कमी जीएसटीचा ग्राहकांना फायदा
बीएससी मॉलमध्ये दिवाळीच्या जवळ जवळ महिनाभर आधीपासूनच दिवाळीच्या खरेदीची धूम सुरू होती. दिवसभर ग्राहकांचा ओघ कायम होता. मुख्य म्हणजे जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांना त्याचा फायदा झाला. शिवाय आम्हीही 6 टक्के सवलत दिली होती. त्यामुळे एकूणच ग्राहकांकडून दिवाळीची खरेदी तेजीत झाली. दुपारनंतर पावसाने काही काळ व्यत्यय आणला, परंतु एकूण दिवाळीची खरेदी समाधानकारक झाली, असे बीएससी टेक्सटाईलचे संचालक बी. सी. चंद्रशेखर यांनी सांगितले.
– बी. सी. चंद्रशेखर









