प्रतिनिधी /वास्को
झुआरी नदीवरील नवीन चौपदरी पुल रविवारी संध्याकाळपासून लोकांना पाहण्या, फिरण्यासाठी खुला झाला आहे. काल पहिल्याच दिवशी लोकांकडून उत्साही प्रतिसाद लाभला. लोकांनी मोठय़ा संख्येने या संधीचा लाभ घेतला. येत्या बुधवारपर्यत हा पुल संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत लोकांसाठी खुला राहणार आहे.
साधारण चार वर्षापूर्वी पणजीतील मांडवीवरील अटल सेतू उद्घाटनानंतर काही दिवस लोकांना पाहण्या फिरण्यासाठी खुला ठेवण्यात आला होता. लोकांनी त्या पुलावर फिरण्याचा आनंद अनुभवला होता. त्याच आनंदाची आठवण करून देणारा कालचा रविवार होता.
पहिल्याच दिवशी हा नवीन पुल पाहण्यासाठी लोकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. पुलाच्या दक्षिण दिशेने आणि उत्तर दिशेने चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी पडली होती. पुलावर मात्र, सायकलसुध्दा संधी नव्हती. दक्षिण व उत्तर गोव्यातील जवळपासच्या लोकांनी हा पुल फिरून पाहण्याची संधी घेतली. यात लहान मुलांपासून वृध्दांचाही समावेश होता. फोटोग्राफी आणि सेल्फीला पहिल्या दिवसापासूनच बहार आला. रात्री आठ ते साडे आठपर्यत नवीन पुल लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. नवीन पुल फिरून पाहण्यासाठी गर्दी पडल्याने कुठ्ठाळीतील नाक्यावर वाहतुकीचा बराच ताण निर्माण झाला होता. काही प्रमाणात वाहतूक कोंडीही सहन करावी लागली.









