भारत अन् पाकिस्तानकडून कराराचे पालन
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानने बुधवारी स्वत:च्या आण्विक केंद्रांच्या यादीचे आदान-प्रदान केले. हे आदान-प्रदान दोन्ही देशांदरम्यान एका करारांतर्गत करण्यात आले आहे. हा करार दोन्ही देशांना परस्परांच्या आण्विक तळांवर हल्ला करण्यापासून रोखतो.
ही यादी नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये कूटनीतिक माध्यमांद्वारे पुरविण्यात आली. भारत आणि पाकिस्तान दरम्यान दरवर्षी एक जानेवारी रोजी या यादीचे आदान-प्रदान होते. यासंबंधीच्या करारावर 31 डिसेंबर 1988 रोजी दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली होती. तर 27 जानेवारी 1991 रोजी हा करार लागू करण्यात आला होता. या कराराचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान आण्विक केंद्रांची सुरक्षा निश्चित करणे आहे.
नागरिक कैद्यांची यादीही सादर
याचबरोबर भारत आणि पाकिस्तानने परस्परांच्या ताब्यात असलेल्या नागरिक कैदी आणि मच्छिमारांच्या यादीचेही आदान-प्रदान केले. हे आदान-प्रदान 2008 च्या कौन्स्युलर अॅक्सेस कराराच्या अंतर्गत करण्यात आले आहे. यानुसार दोन्ही देश दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलै रोजी परस्परांच्या कब्जात असलेल्या नागरिक कैदी आणि मच्छिमारांची यादी देत असतात. भारताने 381 नागरिक कैदी आणि 81 मच्छिमारांच्या नावाची यादी दिली असून हे पाकिस्तानी नागरिक आहेत किंवा पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. तर पाकिस्तानने 49 नागरिक कैदी आणि 217 मच्छिमारांच्या नावांची यादी दिली असून हे सर्वजण भारतीय नागरिक आहेत किंवा भारतीय नागरिक असल्याचा पाकिस्तानला संशय आहे.
कैदी, मच्छिमारांची लवकर मुक्तता व्हावी
पाकिस्तनाने लवकरात लवकर या नागरिक कैदी, मच्छिमार आणि बेपत्ता भारतीय सैनिकांची मुक्तता करावी आणि त्यांना भारतात पाठवावे. शिक्षा पूर्ण केलेले 183 भारतीय मच्छिमार आणि नागरिक कैद्यांची मुक्तता लवकर करावी असे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. याचबरोबर पाकिस्तानच्या तुरुंगात कैद 81 भारतीय नागरिकांना अद्याप कौन्स्युलर अॅक्सेस देण्यात आलेला नाही, तो त्वरित त्यांना प्रदान करावा. सर्व भारतीय नागरिक कैदी आणि मच्छिमारांची ते भारतात परतत नाही तोवर सुरक्षा सुनिश्चित करावी अशी सूचना विदेश मंत्रालयाने पाकिस्तानला केली आहे.









