सुकृत मोकाशी / पुणे :
‘आदिपुरुष’ या चित्रपटात ‘सीजीआय’ या तंत्रज्ञानाचा अतिवापर करण्यात आला आहे. तथापि, त्यावर पूर्णपणे अवलंबून रहायला नको होते, असे परखड मत कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
‘आदिपुरुष’ या सिनेमाबद्दल सध्या खूप चर्चा असून, त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल खूप बोलले जात आहे. त्यावर विधाते यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आदिपुरुष या सिनेमात सीजीआय’ इफेक्टचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्याचा एवढा अतिरेक व्हायला नको होता. त्यावर पूर्णपणे अवलंबून रहायला नको होते. सिनेमामध्ये एवढे मोठे कलाकार आहेत. त्यांच्या रिअल ऍक्ट, मूव्हमेंट दिल्या असत्या, तर ते अधिक योग्य ठरले असते.
कथा हा भाग उभा करताना ‘रामायण’ ग्रंथ हा तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. हे लक्षात घ्यायला हवे होते. हा इतिहास आहे. इतिहास वेगळ्या प्रकारे मांडता येतो. त्याची मोडतोड करता येत नाही. मांडणी करताना हे लक्षात घ्यायला हवे होते. रामायण हे सत्ययुगातील आहे. सत्ययुगात शत्रूलादेखील आदराने बोलले जायचे. मात्र, सिनेमात तशी लिबर्टी घेण्याचा प्रयत्न होता. जाणीवपूर्वक अपमान नाही, हे लक्षात येते, असेही त्यांनी सांगितले.
सिनेमाचे संवाद, वेशभूषा, कलाकारांच्या हालचाली, लोकेशन या सगळय़ा गोष्टींवर अभ्यास केला नव्हता, असे नाही. पण, केलेल्या अभ्यासाची मांडणी करताना हा विषय भारतीय जनतेच्या किती आत्मीयतेचा आहे, याचा विचार होणे गरजेचे होते. या चित्रपटाच्या प्रिमियला उपस्थित असणाऱ्यांना याबद्दल कसे काही आक्षेपार्ह वाटले नाही, याबद्दलही विधाते यांनी आश्चर्य व्यक्त केले.









