जांबोटीत प्रचंड कोंडी : शंकरपेठनजीक वाहन अडकल्याने जांबोटी-खानापूर रस्त्यावरील वाहतूक पाच तास ठप्प
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज महामार्गावरील शंकरपेठ चढावानजीक रस्त्याच्या मधोमध ट्रक अडकल्यामुळे या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक रविवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. गोव्याहून-खानापूरकडे जाणारी शेकडो अवजड वाहतूक करणारी वाहने जांबोटी बसस्थानकादरम्यान रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आल्यामुळे, रविवारी जांबोटी बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची केंडी झाल्यामुळे नागरिक, वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. जांबोटी-खानापूर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरूच आहे. वाढत्या अवजड वाहतुकीमुळे महामार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अवजड वाहने अडकून पडण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या असल्याने अवजड वाहतुकीची समस्या नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे.
रविवारी सकाळी खानापूरहून- गोव्याकडे जाणारा 14 चाकी माल वाहतूक ट्रक शंकरपेठ चढतीला रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक दुपारपर्यंत ठप्प झाली होती. रस्त्यावरच ट्रक अडकल्यामुळे अन्य वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गोव्याहून-खानापूरकडे जाणाऱ्या शेकडो ट्रक चालकांनी आपली वाहने जांबोटी बसस्थानक परिसरातच रस्त्याच्या कडेला थांबविने पसंत केल्यामुळे सुमारे 1 किलोमीटर अंतरापर्यंत बेळगाव-चोर्ला महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर अवजड वाहने थांबविल्यामुळे जांबोटी बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. ऐन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत वाहतूक कोंडी झाल्यामुळे ती सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी पोलीसही उपलब्ध नसल्याने रविवारी दुपारपर्यंत वाहतूक कोंडीत भरच पडली होती. त्यामुळे बेळगाव-गोवा आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवासी वर्गांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागला.
अवजड वाहतुकीवर निर्बंध घालून समस्या सोडवा
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर दिवसेंदिवस अवजड वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर अडकून पडत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम या भागातील बस सेवेवर देखील झाला आहे. जांबोटी-कणकुंबी भागात खानापूर आगारामार्फत अनेक गावासाठी बससेवा सुरू केल्या आहेत. या सर्व बसेस खानापूर -जांबोटी मार्गावरूनच पुढे प्रस्थान करतात. मात्र या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम या भागातील बस सेवेवर झाला आहे. बस वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे बसफेऱ्या बंद केल्याने या भागातील बेळगाव, खानापूर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी बेळगाव जिल्हाधिकारी व खानापूर तहसीलदारांनी लक्ष घालून जांबोटी खानापूर महामार्गावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीवर निर्बंध घालून जनतेची या समस्येतून सुटका करावी अशी मागणी होत आहे .









