पहिल्याच दिवशी वॉटर सॅल्यूट : अधिवेशनानंतरही विमानफेरी सुरू ठेवण्याची मागणी
बेळगाव : बेळगावमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी इंडिगो एअरलाईन्सने एअर बससेवा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बऱ्याच दिवसानंतर बेळगाव विमानतळावर 186 प्रवासी क्षमता असलेले विमान दाखल होत आहे. पहिल्याच दिवशी या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आले. बेळगावहून बेंगळूरला ये-जा करण्यासाठी सध्या एकच विमानसेवा उपलब्ध होती. यापूर्वी सुरू असलेली सकाळची विमानफेरी महिनाभरापासून बंद होती. परंतु अधिवेशन काळात मंत्री, आमदार तसेच त्यांच्या सचिवांना अधिवेशनासाठी विमानसेवा आवश्यक होती. यासाठी इंडिगो एअरलाइन्सने सकाळची विमानफेरी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारपासून विमानफेरीला सुरुवात झाली. सकाळी 6 वाजता बेंगळूर विमानतळावरून विमान बेळगावच्या दिशेने रवाना होत आहे. पहिल्या दिवशी एकूण 148 प्रवासी बेळगावला आले. तर बेळगावहून 50 प्रवासी बेंगळूरच्या दिशेने रवाना झाले. मंगळवारीही या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही विमानफेरी केवळ अधिवेशनादरम्यान नाही तर त्यानंतरही सुरू ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.









