सावर्डेतील जोतिर्लिंग मंदिरात जपले पुजेतील वैविध्य : ग्रामस्थांनी केला पुजाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात नवरात्रोत्सवाच्या कालावधीत जोतिबा देवाची उत्कृष्ट पुजा बांधल्याबद्दल ग्रामस्थांनी पुजाऱ्यांचा सत्कार केला. पुजारी प्रदीप वसंत गुरव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि गुरव समाज बांधवांनी गेले आठ दिवस श्री जोतिबाची अत्यंत उत्कृष्ट पूजा बांधली आहे. प्रत्येक दिवशी विविध रूपातील पूजा बांधून भाविकांचे लक्ष वेधून घेतले. त्याबद्दल मल्हारपेठ, सावर्डे आणि मोरेवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाईसह अन्य कामे केल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी आणि विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी करणाऱ्या ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सावर्डेसह मल्हारपेठ, मोरेवाडी, जाधववाडी या चार गावातील ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने नवरात्रोत्सव साजरा करतात. येथील श्री जोतिबा हे चार गावांचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे येथील नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. यावेळी सावर्डेचे सरपंच संभाजी कापडे, मल्हार पेठचे सुदर्शन पाटील, मोरेवाडीचे सरपंच रणजीत तांदळे, मल्हारपेठचे उपसरपंच राजेंद्र महाजन, ‘तरुण भारत संवाद’चे विशेष प्रतिनिधी कृष्णात चौगले यांच्यासह तिन्ही गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी बी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. मोरेवाडीचे सरपंच रणजित तांदळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.









