पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांचा दावा : शॅकधारकांशी पोलिसांनी साधला सुसंवाद
म्हापसा : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कळंगूट पोलिसांच्या कर्तबगारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित कऊन खंडणी, कळंगूट किनारी भागात अवैध धंदे, दलालवर्ग, वेश्या व्यवसाय चालतो असे संबोधले होते. त्या पार्श्वभूमीवर असता कळंगूट पोलिसांनी किनारपट्टीवरील शॅक मालकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र कुणीही खंडणीबाबत प्रश्न उपस्थित केला नाही. शिवाय गुन्हेगारी नियंत्रणात असून कळंगूट पोलीस उत्कृष्ट सेवा देत असल्याचे सर्व शॅक मालकांनी सांगितल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मंत्री रोहन खंवटे यांचे आरोप तथ्यहीन म्हणावे का? अशी विचारणार पत्रकारांनी केली असता याबाबत आपण लवकरच मंत्री खंवटे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना भेटून त्यांचे म्हणणे जाणून घेणार व काही समस्या असल्यास त्या सोडवू, असे अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले. कळंगूट पोलीस स्थानकात किनारी भागातील शॅकधारकांची खास बैठक बोलावण्यात आली होती. सुमारे 150 शॅकधारक यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कळंगूट निरीक्षक दत्तगुरू सावंत, पर्यटन निरीक्षक सचिन गांवस, उपनिरीक्षक रमेश हरिजन, किरण नाईक, किशोर रामानंद व महिला अपनिरीक्षक प्रगती मलीक उपस्थित होते.
आरोपांच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली
शॅकधारक, रेस्टॉरंट मालक व काही ग्रामस्थांच्या काही मागण्या होत्या. शिवाय किनारी भागात होत असलेल्या मंत्र्यांच्या आरोपावरून कळंगूट पोलीस हद्दीत सर्वांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत त्यांच्या एकत्रित समस्या पोलीस वर्गांनी ऐकून घेतल्या.
लाऊड म्युझिककडे लक्ष देण्याचे निरीक्षकांचे आदेश
अलिकडच्या दिवसात किनारीपट्टीवर अवैध धंदे, खंडणी प्रकरण सोशल मीडियाद्वारे बरेच गाजले खरे मात्र याबाबत पोलिसांकडे कुणीच तक्रार केली नाही असे अधीक्षक वाल्सन म्हणाले. यासाठी आपण थेट नागरिकांशी संपर्क साधला व त्यांना आपला नंबरही दिला असल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट केले. लाऊड म्युझिक वाजवतात ही प्रमुख समस्या होती. त्यानुससार उपअधीक्षक तसेच निरीक्षकांना न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नंतर लाऊड म्युझिक पूर्णत: बंद करण्यास सांगितले असल्याचे अधीक्षक म्हणाले.
खंडणीबाबत पोलीस चौकशी
खंडणीबाबत सोशल मीडियावरून सात जणांनी काही लोकांच्या नावे पत्र व्हायरल केले होते. त्याबाबत सायबर क्राईम, गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मात्र ही तक्रार कुणी दिली हे कळणे कठीण आहे. मात्र दोघेजण आपली तक्रार घेऊन आपल्या नावाची बदनामी करणारी खोटी सही केल्याचे म्हणाले होते. त्याबाबत पोलीस चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र आजपर्यंत त्याबाबत काही तथ्य बाहेर आले नाही. जोपर्यंत याबाबत कुणी स्वत:हून तक्रार घेऊन येत नाही तोपर्यंत थेट त्याबाबत चौकशी करणे कठीण काम असल्याचे अधीक्षक म्हणाले.
आमदार लोबोंनीच विषय संपवला
अलिशान हॉटेलात खंडणी बाहदारांनी बैठक घेतली. खंडणी मागितली अशा अफवा झाल्या. खुद्द आमदार मायकल लोबो यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मात्र नंतर यात काही तथ्य नाही हा विषय संपला असल्याचे खुद्द आमदार लोबो यांनी स्पष्ट केले. क्राईम ब्रांचनेही याबाबत सर्वत्र चौकशी केली मात्र त्यात काही सत्य बाहेर आले नाही. याबाबत कुणी तक्रारही दिली नाही. तसे काही असल्यास अवश्य कारवाई केली जाईल असे अधीक्षक वाल्सन म्हणाले. वेश्या व्यवसायाबाबत आमच्याकडे तक्रारी आल्यास आम्ही कारवाई करतोच. अवैध धंदे चालल्यास त्यावर कारवाई होणारच.
हैदराबाद पोलिसांना सदैव मदत, आरोप तथ्यहीन
हैदराबाद अधीक्षक गोवा पोलीस काहीच मदत करीत नाही असे म्हटल्यास आम्ही त्यांच्याकडे 25 वेळा संपर्क साधल्याचे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना पोलीस, हैदराबाद क्राईम ब्रांच हे आमच्याकडे आले आहेत. जेव्हा जेव्हा त्यांनी आमच्याकडे संपर्क साधला त्या त्या वेळी आम्ही त्यांना मदत केली आहे. उत्तर गोव्यात 25 वेळा पोलीस व क्राईम ब्रांच तसेच दक्षिण गोव्यात अमलीपदार्थ विरोधी पथकांनी मदत केली आहे. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे आरोप अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पत्रकारांशी बोलताना केले. हैदराबाद पोलिसांना आम्ही अलिकडेच खंडणीप्रकरणी आरोपी पकडून दिला आहे, असे ते म्हणाले.
किनाऱ्यावर आऊटपोस्ट उभारण्याची मागणी
किनारी भागात मोठ्या प्रमाणात भिकारी भीक मागून पर्यटकांना त्रास देतात. रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत किनारी भागात मोठ्याने म्युझिक सुरू असते. तात्काळ गुन्हेगाऱ्यावर कारवाई करण्यासाठी किनारी भागात आऊटपोस्ट उभारावा, अशी मागणी यावेळी शॅकधारकांनी केली. उपनिरीक्षक प्रगती मलीक यांनी आभार मानले.









