बेळगाव : शहर व उपनगरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे रामदेव गल्लीत नवीन गटार बांधकामासाठी खोदकाम केले जात आहे. लवकरच त्या ठिकाणी काँक्रिटच्या गटारी बांधल्या जाणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. याचा नाहक त्रास शहरवासियांना सहन करावा लागत असल्याने पावसाळ्यापूर्वी गटारींची सफाई करण्यात यावी, अशी मागणी दरवर्षी केली जाते.
पण महापालिकेकडून नाले व गटारींची सफाई केल्याचा बनाव केला जातो. पण प्रत्यक्षात दरवर्षी ही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. रामदेव गल्लीत दगडी बांधकाम करण्यात आलेली जुनी गटार होती. त्यामध्ये केरकचरा व माती तुंबल्याने पाणी वाहून जाणे कठीण झाले होते. ही बाब लक्षात येताच महापालिकेच्यावतीने नवीन गटार बांधण्यासाठी खोदकाम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी काँक्रिटच्या गटारी बांधल्या जाणार असून गटारीची रुंदी व खोली अधिक असणार आहे. त्याचबरोबर गटारीवर काँक्रिटचे स्लॅब घालण्यात येणार असून ठिकठिकाणी चेंबर सोडण्यात येणार आहेत. गटारीचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









