एक बाजू बंद तर दुसऱया बाजूच्या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहर आणि उपनगरात सर्वत्र जलवाहिन्या घालण्यात येत असून कणबर्गी रोडवर जलवाहिन्या घालण्यासाठी नंदिनी डेअरी परिसरात खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रस्ता एका बाजूने बंद ठेवून एका बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे.
शहरातील दहा वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. याकरिता सर्वत्र जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खानापूर रोडसह शहरातील विविध भागात जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. बसवनकोळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पामधून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. याकरिता शहरात 25 जलकुंभांची उभारणी केली जाणार आहे. जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. कणबर्गी रोडवर जलवाहिन्या घालण्यात येत असून नंदिनी डेअरी परिसरात खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावहून कणबर्गीकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. सध्या एका बाजूच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. जलवाहिन्या घालण्यात येत असल्याने टप्प्याटप्प्याने रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. सध्या जलकुंभाच्या उभारणीचे काम सुरू असून जलकुंभापर्यंतच्या मुख्य जलवाहिन्या घालण्यात येत आहेत.
पहिल्या टप्प्यात 16 उपनगरांमध्ये 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत काही भागात 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच ही कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.









