ड्रेनेजची पाईप घालण्यासाठी खोदाई : मातीचा ढिगारा केल्याने अनेक वाहनधारक पडून जखमी
वार्ताहर /धामणे
धामणे मेन रस्त्यावर मध्यरात्री खोदाईचे काम करणाऱ्या खासगी घर मालकांना धामणे परिसरातील वाहनधारकांनी चांगलाच जाब विचारला. वडगाव ते धामणे रस्त्याशेजारी नवीन घरे बांधण्यात येत आहेत. हे घरमालक रस्ता खोदाई करून ड्रेनेजला पाईप जोडत आहेत. परंतु खोदाई केलेल्या मातीचा ढिगारा रस्त्यावर आडवा दोन ते तीन फूट उंच करत आहेत. हे खोदाईचे काम रात्री 12 नंतर करण्यात येत आहे. त्यामुळे पहाटे चारपासून धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी या भागातील नागरिक व्यवसायासाठी आणि भाजी मार्केटला जाणारे शेतकरी या रस्त्याने शहराकडे येत असतात.
ढिकाऱ्यावरुन पडल्याने दुचाकीस्वार जखमी
रात्री अचानक रस्त्यात खोदाई केल्याने मातीचा ढिगारा उंच असल्याने यावरून गेल्या दोन दिवसात पडल्यामुळे पाच ते सहा दुचाकीधारक जखमी झाल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे वडगावपासून दोन अडीच किलो मीटरपर्यंत शहापूर वडगावातील शेतकऱ्यांची रस्त्याच्या दुतर्फा शेती आहे. त्यामुळे हे शेतकरी पहाटे शेताकडे जाताना या मातीच्या ढिगाऱ्यामुळे त्रासदायक होत आहे.
मनपाने लक्ष देण्याची मागणी
वडगाव ते धामणे या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर कोणीही खोदाई करत असली तरी त्यांना विचारण्यासाठी शासन आहेत की नाही असा संतप्त सवाल वाहन धारकांनी केला. वडगाव परिसरातील नागरिक या रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकत आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. हा रस्ता वडगावपासून 1 कि. मी. पर्यंत कार्पोरेशन हद्दीत येतो. त्यामुळे बेळगाव कार्पोरेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यावरील खोदाई आणि टाकण्यात येत असलेला कचरा बंद करावा, अशी मागणी धामणे परिसरातील नागरिक व वडगाव शहापुरातील शेतकऱ्यांतून होत आहे.









