काहीकाळ वाहतूक कोंडी
बेळगाव : काँग्रेस रोड, टिळकवाडी येथे मंगळवारी ड्रेनेज वाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. चन्नम्मानगर कॉर्नर येथे काँक्रिटच्या रस्त्याची खोदाई करून ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू होते. यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली. मुख्य रस्त्यावर खोदाई करण्यात येत असल्याने काही नागरिकांनी जाब विचारला. परंतु त्यांना समर्पक उत्तरे देण्यात आली नाहीत. टिळकवाडी परिसरात सध्या अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. तिसरा रेल्वेगेट उड्डाणपुलाचे दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी साहित्याची जमवाजमव करण्यात येत आहे. त्याचबरोबर दुसरा रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच पिलरसाठी आरेखन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी दुसरा व तिसरा रेल्वेगेट दरम्यान खोदाईला सुरुवात झाली. सुरुवातीला उड्डाणपुलासाठीच खोदाई सुरू झाली का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आला. परंतु खोदाई करणाऱ्यांना विचारले असता ड्रेनेज वाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे ट्रॅकपासून चन्नम्मानगर कॉर्नरपर्यंत खोदाईचे काम सुरू होते.









