शासनाचा कोट्यावधीचा निधी वाया : काम युद्धपातळीवर सुरू असले तरी योग्य पद्धतीने होणे आवश्यक : अधिकाऱ्यांनी कामाकडे जातिनीशी लक्ष देणे गरजेचे
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
हजारो शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या मार्कंडेय नदीच्या पात्राची खोदाई शासनाच्या रोजगार हमी योजनेतून युद्धपातळीवर सुरू आहे. कामगारांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने शासनाने सदर योजना सुरू करून आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नदीपात्र खोदाईच्या नावाखाली काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा निधी वाया जाणार असल्याच्या प्रतिक्रिया अलतगे व कंग्राळी परिसरातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. मार्कंडेय नदीचे उगमस्थान बैलूर येथे असून ती राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, बिजगर्णी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ, उचगाव, मण्णूर, आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, जाफरवाडी, कडोली, गौंडवाड, काकती, होनगा आदी किर्यात भागातील शेतवडीतून वाहत जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते. मार्कंडेय नदीचे पुनरुज्जीवन व खोदाई केल्यामुळे नदीपात्रामध्ये पाणीसाठा अधिक काळ राहून शेतकरीवर्गाला व पाणीटंचाईवर मात करता येईल. खोदाई काम युद्धपातळीवर सुरू असले तरी सर्वसामान्यांना काम देण्याचा उद्देश समोर ठेवून योग्य काम करून घेणे शासनाची जबाबदारी आहे. परंतु तसे होत नसल्यामुळे शासनाचे करोडो रुपये वाया जाणार असल्याच्याही प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. सध्या अलतगे व कंग्राळी परिसरातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीपात्रात रोजगार हमी योजनेतून खोदाईचे काम सुरू आहे. परंतु खोदाई केलेली माती चुकीच्या पद्धतीने नदीच्या काठावरच टाकण्यात येत आहे. ती माती अन्यत्र हलवावी, अन्यथा पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराने माती परत नदीपात्रात वाहून जाणार व नदीपात्र जैसे थे राहणार.
नदीकाठावरील शेकडो झाडांना धोका
शासन ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश सर्वांना देत असते. प्रत्येकाने जरी एक झाड लावून ते जगविले तर प्रत्येकवर्षी लाखो झाडे तयार होतील. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. परंतु मार्कंडेय काठावर झाडे लावून जतन केलेल्या झाडांनाही धोका निर्माण होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दोन वर्षापूर्वीही खोदाई
गेल्या दोन ते चार वर्षापूर्वीही मार्कंडेय नदीची रोजगार हमी योजनेतून खोदाई करण्यात आली होती. यावेळीही जवळजवळ 20 कोटी रुपये नदीच्या पुनरुज्जीवनासाठी खर्च करण्यात आले होते. त्यावेळीही खोदाई केलेली माती नदीकाठावर टाकल्यामुळेच पूर आल्यावर नदीचे पात्र पूर्वीसारखे गावाने भरून गेले. ही परिस्थिती शासनाला माहित असुनसुद्धा पुन्हा माती काठावरच टाकण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांना रोजगार देण्याच्या उद्देशाने शासनाचा निधी वाया जात आहेत. याला जबाबदार कोण? असेही प्रश्न शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.
नदीला नाल्याचे स्वरुप
मार्कंडेय नदीला काही ठिकाणी नाल्याचे स्वरुप आले आहे. याठिकाणची प्रथम खोदाई करून पात्र रुंद करणे गरजेचे आहे. परंतु तसेही होत नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी नदीपात्राचा सर्व्हे करून पात्राची रुंदी शासकीय दप्तरात किती आहे, त्याप्रमाणे केल्यास नदीचे स्वरुप बदलणार आहे, असेही बोलले जात आहे.
नदीपात्रातील खोदाई केलेली माती अन्यत्र हलविणे गरजेचे
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने शासनाने रोजगार हमी योजनेतून मार्कंडेय नदीपात्र खोदाई काम सुरू केले याचे आम्ही स्वागत करतो. परंतु केलेले काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे आहे. नदीपात्रातील खोदाई केलेली माती ट्रॅक्टरच्या साहाय्याने अन्यत्र हलविणे गरजेचे होते. परंतु तसे होत नाही. माती काठावरच टाकण्यात येत आहे. यामुळे नदीला आलेल्या पहिल्या पुरानेच ही माती पण नदीपात्रात जाणार आहे आणि शासनाचा करोडो रुपयांचा निधी पाण्यात आणि मातीत जाणार आहे, या नुकसानीला जबाबदार कोण?
– प्रगतशील शेतकरी, चंद्रकांत धुडूम (अलतगा)









