मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘परीक्षा पे चर्चा’
साखळी : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी केलेची चर्चा ही येणाऱ्या पिढीसाठी व विकसित भारतासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. परीक्षा म्हणजे ताण घेण्याचा क्षण नसून तो एक उत्सव असल्याचा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांमधील परिक्षेची भिती नष्ट करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमानंतर बोलताना म्हटले. सांखळी रवींद्र भवनात मुख्यमंत्र्यांनी सुमारे 800 विद्यार्थ्यांसह हा लाईव्ह कार्यक्रम पाहिला आणि नंतर मार्गदर्शन केले. यावेळी सांखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे, उपसंचालक मनोज सावईकर, सांखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, गोवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रूपेश ठाणेदार, भाग शिक्षणाधिकारी लीना कळंगुटकर, भाजप उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर व इतरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणार
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची ही आठवी आवृत्ती असून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणासाठीच प्रेरीत व उत्साहीत न करता सर्वात महत्वाचा टप्पा असलेल्या परीक्षांसाठी आत्मविश्वास देणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना व कल्पकता सर्वात अनोखी व महत्वाची आहे. त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा व विविध पैलूंवर केलेले मार्गदर्शन आजच्या विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी लाभदायी ठरणार, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे म्हटले.
विद्यार्थ्यांना भविष्याची भीती नको
विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही स्वत: तणावमुक्त राहताना विद्यार्थ्यांना तणावाखाली ठेऊ नये. विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांचे लक्ष्य देऊन ते सकारात्मक आणि उत्साही मार्गातून साध्य करण्यासाठी प्रेरित करावे. तसेच त्यांच्या भविष्याची भीती आतापासूनच त्यांच्या मनात निर्माण करून आजच्या त्यांच्या शिक्षणावर परिणाम करू नये. त्यांना आजचे शिक्षण दिलखुलासपणे घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले.









