अवशेषांमध्ये फेरफार झाले नसल्याचे डॉक्टरांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या संसदेत मागील आठवड्यात दाखविण्यात आलेल्या कथित एलियन (परग्रहवासीय)च्या मृतदेहांचे प्रयोगशाळेत परीक्षण झाले आहे. ममींना वेगवेगळ्या हाडांनी जोडून तयार करण्यात आलेले नाही. हा पूर्ण एकाचाच सांगाडा आहे. तसेच एलियनच्या सांगाड्यात जोडतोड केल्याचे कुठलेच पुरावे मिळाले नसल्याचे परीक्षण अहवालात म्हटले गेले आहे.
एलियनच्या अवशेषांवरील हे परीक्षण नौदलाच्या फोरेन्सिक डॉक्टर जोश बेनिटेज यांनी केले आहे. सांगाड्याच्या तपासणीतून संबंधित जीव एकेकाळी जिवंत होता आणि याच्या शरीरात गर्भाशयसदृश अवयव आहे. मृत्यूपूर्वी संबंधित जीव गरोदर असण्याची शक्यता आहे. या अवशेषांशी माणसांचे कुठलेच देणेघेणे नसल्याचा दावा डॉक्टर बेनिटेज यांनी केला आहे.
या अवशेषांचे मानवी उत्क्रांतीशी कुठलेच कनेक्शन नाही, असा दावा मेक्सिकन पत्रकार तसेच यूफोलॉजिस्ट जेम मोसान यांनी केला होता. हे अवशेष पेरू येथील एका खाणीत मिळाले होते, जे सुमारे 1 हजार वर्षे जुने आहेत. जगाच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचे मोसा यांनी मेक्सिकोच्या संसदेत एलियन ममी सादर करताना म्हटले होते.
परंतु अनेक वैज्ञानिकांनी कथित एलियन ममीला फेटाळत याला एक क्रिमिनल स्टंट ठरविले होते. मोसान कथित एलियनच्या अवशेषांचा डाटा सार्वजनिक का करत नाहीत असा प्रश्न नासाचे वैज्ञानिक डॉ. डेव्हिड स्पर्गेल यांनी केला होता.
मोसान यांनी सादर केलेल्या छायाचित्रांध्ये माणसांप्रमाणेच दिसणारे दोन डोळे, तोंड, दोन हात, 2 पाय दिसून येतात. परंतु याच्या हातांमध्ये केवळ 3 बोटं दिसून येतात. मोसान यांनी हे अवशेष पृथ्वीवरील कुठल्याही जीवापेक्षा अत्यंत वेगळे असल्याचे सिद्ध करू शकतो असा दावा केला आहे. 2 अवशेषांपैकी एक अवशेष मादीचे आहेत. मोसान यांनी दोन्ही मृतदेहांना क्लारा आणि मॉरीशियो नाव दिले आहे.









