बसफेऱ्या कमी, वेळेत पोहोचणे अवघड : परिवहनला येणार का जाग?
बेळगाव : शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. मात्र बसफेऱ्या कमी असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फरफट होवू लागली आहे. सध्या आकरावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र येत्या काळात दहावी, बारावी व इतर अंतिम परीक्षांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होण्याची भीती व्यक्त होत आहे. शक्ती योजनेमुळे प्रवासी संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे बससेवा विस्कळीत होवू लागली आहे. महिला प्रवाशांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विविध मार्गाला बसफेऱ्या कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचणे त्रासदायक होवू लागले आहे. बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत बसफेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण होणार आहे. त्यामुळे परीक्षाकाळात परिवहन बसफेऱ्या वाढविणार का असा प्रश्नही सर्वांना पडला आहे.
1 मार्चपासून बारावी परीक्षा
येत्या 1 मार्चपासून बारावीच्या वार्षिक परीक्षांना प्रारंभ होणार आहे. त्यानंतर 25 मार्चपासून दहावी वार्षिक परीक्षांना सुरुवात होणार आहे. मात्र विविध मार्गांवर बसेसची कमतरता असल्याने परीक्षार्थी वेळेत पोहोचणार का? असा चिंताजनक प्रश्नही पालकांसमोर पडला आहे. परीक्षा काळात बससेवा उपलब्ध करून देण्याबाबत परिवहन जागे होणार का? असा प्रश्न पडला आहे.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे होणार हाल
ग्रामीण भागात बससेवा अनियमित झाली आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. काही ठिकाणी परीक्षा केंद्रे 20-25 कि.मी. अंतरावर आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी वेळेत पोहोचतील का? अशी चिंता पालकांना पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा काळात खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता आहे. बसपास असूनही वेळेत बस नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.









