टेक्निकल बोर्डचा गलथान कारभार : डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
बेळगाव : डिप्लोमाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. परंतु विद्यार्थ्यांचे गुण मंगळवार दि. 10 रोजी पर्यंत व्यवस्थित दिसत नसल्याचे दिसून आले. एकीकडे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कौन्सिलिंग सुरू असताना दुसरीकडे निकालाच दिसत नसल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून टेक्निकल बोर्ड जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांतून केला जात आहे. दुसऱ्या, चौथ्या व सहाव्या सेमिस्टरचे निकाल शुक्रवार दि. 6 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आले. परंतु ज्या वेबसाईटवर निकाल जाहीर झाला. त्या वेबसाईटवर मंगळवारी दुपारपर्यंत निकाल दिसत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. काही विद्यार्थ्यांनी टेलिग्रामद्वारे टेक्निकल बोर्डला तक्रारी कळविल्या. परंतु त्यांच्याकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही.
विद्यार्थ्यांची गैरसोय
डिप्लोमा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या सत्रात प्रवेश दिला जातो. परंतु प्रवेशासाठी कागदपत्रांची छाननी होणे आवश्यक असते. परीक्षांचे गुणच उपलब्ध होत नसल्याने कागदपत्रांच्या छाननीला कसे उपस्थित राहणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित होत आहे. राज्यातील टेक्निकल बोर्डकडून अशा प्रकारे विद्यार्थ्यांची गैरसोय केली जात असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दोन दिवसात निकाल व्यवस्थित न दिल्यास आंदोलन
बेळगावमधील काही विद्यार्थी बेंगळूर येथील कार्यालयाला गेले होते. परंतु तेथेही त्यांना दाद देण्यात आली नाही. टेक्निकल बोर्डच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. येत्या दोन दिवसात निकाल व्यवस्थितरित्या वेबसाईटवर न दिल्यास विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.









