अभ्यासक्रम इंग्रजीत असला तरीही विद्यार्थ्यांना मिळणार मुभा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याची अनुमती देण्याचा निर्देश विद्यापीठांना दिला आहे. संबंधित अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यार्थ्यांना लवकरच मातृभाषा किंवा स्थानिक भाषेत परीक्षा देता येणार असल्याची माहिती युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिली आहे. उच्चशिक्षण संस्था अभ्यासक्रम तयार करण्यात आणि मातृभाषा/स्थानिक भाषांमध्ये शिक्षण प्रदान करण्याच्या प्रक्रियेचे समर्थन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या प्रयत्नांना मजबूत करणे आणि मातृभाषा/स्थानिक भाषेत अभ्यासक्रम तयार करणे तसेच अन्य भाषांमधील पुस्तकांच्या अनुवादासह शिक्षणात त्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या पुढाकाराला चालना मिळणे आवश्यक असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत उत्तरे लिहिण्याची अनुमती मिळावी. स्थानिक भाषांमध्ये मूळ लेखनाच्या अनुवादाला चालना देण्यात यावी आणि विद्यापीठांमध्ये शिकविण्याच्या प्रक्रियेत स्थानिक भाषेचा वापर केला जावा, असे युजीसी प्रमुखांनी म्हटले आहे.
शिक्षणात भारतीय भाषांचा सातत्यपूर्ण वापर नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. हे धोरण मातृभाषा आणि स्थानिक भाषांमध्ये शिक्षण घेण्याच्या महत्त्वावर जोर देणारे आहे. यामुळे विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता वाढून व्यक्तिमत्त्वाचा समग्र विकास सुनिश्चित होणार असल्याचे जगदीश कुमारांकडून सांगण्यात आले.









