सरस्वतीनगर-गणेशपूर येथील घटना
बेळगाव : सरस्वतीनगर, गणेशपूर येथील एका माजी सैनिकाच्या घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी सुमारे 10 लाखाचा ऐवज पळविला आहे. गुरुवारी कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून चोरीच्या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. शिवराम गणपती भट्ट (रा. सरस्वतीनगर, गणेशपूर) यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी 118 ग्रॅम सोने, 350 ग्रॅम चांदी, मनगटी घड्याळ, मोत्याचा हार, असे सुमारे 9 लाख 78 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती समजताच कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता आपल्या घराला कुलुप लावून शिवराम व त्यांचे कुटुंबीय बेंगळूर येथील आपल्या मुलाकडे गेले होते. गुरुवारी 17 एप्रिल रोजी सकाळी ते बेंगळूरहून परतले. त्यावेळी त्यांच्या घरचा दरवाजा उघडा होता. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून तिजोरीतील दागिने पळविले आहेत.









