वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये सैकुलचे माजी आमदार यमथोंग हाओकिप यांच्या पत्नी चारुबाला हाओकिप यांचा कांगपोकपी जिल्ह्यातील त्यांच्या घरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मृत्यू झाला आहे. मणिपूर पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
59 वर्षीय चारुबाला हाओकिप या मैतेई समुदायाशी संबंधित होत्या आणि कुकी-जोमी समुदायाचे प्रभुत्व असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यातील एकौ मुलम येथे राहत होत्या. 64 वर्षीय यमथोंग हाओकिप यांनी 2012 आणि 2017 मध्ये दोनवेळा काँग्रेसचे उमेदवार म्हणून सैकुल विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले होते.
हाओकिप यांच्या घराबाहेरील सामग्रीत आयईडी पेरण्यात आला होता. चारुबाला यांनी ही सामगी उचलताच त्यात स्फोट झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी रविवार दुपारपर्यंत कुणालाच अटक झालेली नाही. हा हल्ला कौटुंबिक वादामुळे देखील झाला असण्याची शक्यता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.









