‘नॉनक्रिमिलेअर’ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्याची मुदतवाढ द्यावी
कोल्हापूर प्रतिनिधी
दाखले देण्याचा सर्व्हर मध्ये अडथळे असल्याने आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (ईडब्ल्युएस) विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरून घेऊन शैक्षणिक प्रवेश द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनाही दिल्या आहेत.
निवेदनात म्हंटले आहे की, राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेशाच्या दाखल्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस ‘फिफो’ प्रणाली स्थगित ठेवून विद्यार्थ्यांचे अर्ज प्राधान्य क्रमाने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे हा प्रश्न सुटला असे वाटत होते. परंतु आता सर्व्हर बंद पडल्याने दाखले देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. गुऊवारी (दि.22) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्याकडील पत्र क्रमांक प्रवेश-0422/ प्र.क्र. 41/ एसडी-2 दिनांक 22 जून 2023 च्या पत्राने शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे. यांना इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया 2023-24. नुसार सन 2023-24 च्या इयत्ता 11 वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास, विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरून घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
त्याच धर्तीवर ‘ईडब्ल्युएस’ विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरून घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी.