सर्वेक्षण अहवाल न्यायालयात दाखल; 1200 फोटो आणि व्हिडिओही सादर
वृत्तसंस्था/संभल
उत्तर प्रदेशातील संभलच्या शाही जामा मशिदीसंबंधी आयोगाचा अहवाल बंद लिफाफ्यात गुरुवार, 2 जानेवारी रोजी न्यायालयात सादर करण्यात आला. या पाहणी अहवालातील अंतर्गत बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार जामा मशिदीत मंदिर असण्यासंबंधी पुरावे सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. या अहवालात साडेचार तासांची व्हिडिओग्राफी आणि 1,200 हून अधिक छायाचित्रेही न्यायालयाला दिल्याचे समजते.
संभल येथील शाही जामा मशिदीचा सर्वेक्षण-पाहणी अहवाल चंदौसी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग आदित्य सिंह यांच्यासमोर सादर करण्यात आला. अॅडव्होकेट कमिशनर रमेश सिंह राघव यांनी गुरुवारी सुमारे 45 पानांचा हा अहवाल दिला. या अहवालात शाही जामा मशिदीत मंदिर असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. तसेच मशिदीच्या आत दोन वटवृक्ष आहेत. साधारणपणे हिंदू धर्मातील मंदिरांमध्येच वटवृक्षाची पूजा केली जाते. एवढेच नाही तर मशिदीत एक विहीर असून ती अर्धी आत आणि अर्धी बाहेर आहे. बाहेरचा भाग झाकण्यात आला आहे.
जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2024 रोजी सुमारे दीड तासाची व्हिडिओग्राफी करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी सुमारे तीन तासांची व्हिडिओग्राफी करण्यात आली. या काळात सुमारे 1200 छायाचित्रे काढण्यात आली. सर्व गोष्टींची तपासणी केल्यानंतर मशिदीच्या आत 50 पेक्षा जास्त कलाकृतीही आढळल्या होत्या. त्याचबरोबर घुमटाचा काही भाग सपाट करण्यात आला आहे. जुने बांधकाम बदलल्याचे पुरावे तसेच त्या ठिकाणी नवीन बांधकाम केल्याचे पुरावेही सापडले आहेत. मंदिराच्या आकाराची रचना प्लास्टरने झाकण्यात आली आहे. वादग्रस्त जागेवर त्या काळातील मंदिरे आणि देवस्थानांमध्ये बनवलेली चिन्हेही सापडली आहेत. मंदिराचे दरवाजे, खिडक्या आणि सुशोभित भिंतींना प्लास्टर करून रंगरंगोटी करण्यात आली आहे.









