काँगेस नेते दिग्विजयसिंग यांचा आरोप, भाजपचा जोरदार प्रतिहल्ला
जम्मू / वृत्तसंस्था
पंतप्रधान मोदी यांनी 2016 मध्ये पाकिस्तानमध्ये भारतीय सेनेने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे अद्याप देलेले नाहीत, असे वादग्रस्त विधान काँगेस नेते दिग्विजयसिंग यांनी केले आहे. ते येथे राहुल गांधी यांच्या पदयात्रेच्या मार्गावर एका जाहीर सभेत बोलत होते. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर काँगेसने जे आरोप केले होते, त्यांचाच पुनरुच्चार करुन सिंग यांनी हेतुपुरस्सर वाद उकरुन काढण्याचे कृत्य कुत्सित बुद्धीने केल्याची प्रतिक्रिया सोशल मिडियावरुन व्यक्त होत आहे. काँगेस पुन्हा पाकिस्तानची भाषा बोलत आहे, असा आरोप भाजपने केला आहे.
उरी येथील सेनेच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याचा सूड उगविण्यासाठी भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीरात घुसून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, तसेच अनेक दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक यांना कंठस्नान घातले होते. या स्ट्राईकचे पुरावे द्या असा घोषा त्यावेळी काँगेसने व इतर विरोधी पक्षांनी लावला होता. नंतर बरीच वर्षे या मुद्दय़ावर काँगेससह विरोधी पक्षांनी बोलणे बंद केले होते. तथापि, आता पुन्हा वाद उकरला जात आहे.
पुरावे द्या
सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अनेक दहशतवादी मारल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो. मात्र, त्याचा पुरावा अद्याप दिला गेलेला नाही. 2019 मध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी बसवर केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 सैनिक हुतात्मा झाले होते. या घटनेसंबंधीही सिंग यांनी पंतप्रधान मोदींना दोष दिला. या सैनिकांना विमानाने पाठविण्याची मागणी अधिकाऱयांनी केली होती. तथापि, ती पंतप्रधान मोदींनी मानली नाही. त्यामुळे हे मृत्यू झाले असा आरोप करत सिंग यांनी आणखी एक वाद निर्माण केला.
भाजपचे जोरदार प्रत्युत्तर
आपल्या देशाच्या सैनिकांच्या पराक्रमावर संशय व्यक्त करुन काँगेसने आपली विकृत मानसिकता पुन्हा प्रदर्शित केली आहे. काँगेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. 40 सैनिकांच्या हौतात्म्याची खिल्ली काँगेस उडवत आहे. बेजबाबदार विधाने करणे हा काँगेसचा स्वभावच आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केली आहे. आपली सेना जेव्हा पराक्रम गाजवते त्यावेळी सर्व भारतीयांची छाती अभिमानाने फुगते. मात्र, काँगेसला या पराक्रमाचे सर्वात जास्त दुःख होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष आणि दुःस्वास करणे हाच काँगेसचा कार्यक्रम असून देशभक्तीपासून काँगेस दूर गेली आहे. दहशतवादाचे अग्रस्थान असणाऱया पाकिस्तानबद्दल काँगेसला प्रेम वाटते, अशी खोचक टिप्पणी भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केली.









