समन्वय समितीपासून माकपने राखले अंतर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपविरोधात स्थापन विरोधी पक्षांच्या आघाडीतील मतभेद आता उफाळून समोर येऊ लागले आहेत. मुंबई येथे झालेल्या आघाडीच्या बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्याचा आणि त्यात स्वत:चा प्रतिनिधी सामील करण्याची तयारी दर्शविल्यावर माकपने युटर्न घेतला आहे.
कोलकाता येथे पार पडलेल्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत इंडियाच्या समन्वय समितीत स्वत:चा सदस्य नियुक्त करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु पक्ष आघाडीत कायम राहणार आहे. याचबरोबर माकपच्या बंगालमधील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप तसेच तृणमूल काँग्रेस विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या घोषणेमुळे इंडिया अंतर्गत भाजपविरोधात एकजूट झालेले पक्ष राष्ट्रीय स्तरावर एकत्र राहू शकणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पॉलिट ब्युरोच्या बैठकीत बंगालमधील अनेक नेत्यांनी स्पष्ट स्वरुपात तृणमूल काँग्रेससोबत जाण्यास आक्षेप घेतला आहे. अशाच प्रकारे माकपच्या केरळ शाखेने राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. याचमुळे माकपने इंडियाच्या समन्वय समितीत स्वत:चा प्रतिनिधी न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत 14 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यातील 13 सदस्यांसंबंधीचा निर्णय त्याचदिवशी झाला होता. तर 14 वे स्थान रिक्त ठेवण्यात आले हेते. स्वत:च्या सदस्याची घोषणा नंतर करणार असल्याचे माकपने म्हटले होते. परंतु पक्षाने आता या समितीत कुठलाच सदस्य नियुक्त न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एकजूट लढाईची गरज आहे याबाबत दुमत नाही. याचमुळे आम्ही या आघाडीत सामील झालो आहोत. ही समान विचारसरणी असलेल्या पक्षांची एकजुटता आहे, परंतु बंगालमध्ये भाजप हा तृणमूल काँग्रेसच्या समर्थनानेच मजबूत झाला आहे. बंगालमध्ये आम्ही भाजप अन् तृणमूल काँग्रेस दोघांविरोधात लढायचे आहे. आम्ही तृणमूल काँग्रेससोबत कधीच आघाडी करणार नसल्याचे माकप नेते सुजन चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस देखील भाजपचा मार्ग अनुसरत आहे. भाजपसोबत आम्हाला तृणमूल विरोधात लढावे लागणार असल्याचे वक्तव्य माकपचे खासदार विकास रंजन यांनी केले आहे. इंडिया आघाडीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबत सामील होण्याच्या निर्णयाला बंगालमधील माकप कार्यकर्ते सातत्याने विरोध दर्शवत आहेत.









