कर्नाटकात 135 आमदारांचे संख्याबळ असलेले पूर्ण बहुमताचे काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन तीन महिनेही पूर्ण झाले नाहीत. तोच काँग्रेसला पक्षांतर्गत बंडाळीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदावर असताना मूळ काँग्रेसजन विरुद्ध उपरे या वादाने उचल खाल्ली होती. तूर्त तरी सिद्धरामय्यांना कोणीही उपरे म्हणून संबोधत नाहीत. आता नव्याच वादाला तोंड फुटले आहे. एखादे सरकार बदलल्यानंतर पहिली प्रक्रिया सुरू होते, ती अधिकाऱ्यांच्या बदल्यांची. आता बदल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या तीसहून अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्राचा मुद्दा फेटाळला असला तरी काँग्रेसला गुरुवारी तातडीची संसदीय पक्ष बैठक बोलवावी लागली आहे. यावरून समस्या आहे, हे अधोरेखित होते.
विधिमंडळ अधिवेशनानंतर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे सिंगापूरला पोहोचले आहेत. विश्रांतीसाठी ते अधूनमधून सिंगापूरला जात असतात. याच मुद्द्यावरून आता काँग्रेसने भाजप व निजद नेत्यांना निशाणा बनविले आहे. काँग्रेस सरकार पाडविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. बेंगळूरमध्ये हा कट रचला तर सर्वांना त्याची माहिती होते. म्हणून सिंगापूरमध्ये बसून हे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने भाजप व निजद नेते एकत्र आले आहेत. ते कोठेही गेले तरी आमचे लक्ष आहे. त्यांच्या मागावर आम्ही आहोत. त्यांनी काहीही केले तरी त्याची आपल्याला माहिती मिळते, असे सांगत सरकार पाडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, याचे सूतोवाच काँग्रेस नेत्यांनी केले आहे. 135 आमदारांचे संख्याबळ असणाऱ्या सरकारला पाडविण्याचे धाडस कोण करणार? ही गोष्ट विचार करण्यासारखी असली तरी भाजपने वेगवेगळ्या राज्यात राबविलेले प्रयोग लक्षात घेता भविष्यात काहीही होऊ शकते, या मतावर काँग्रेस नेते ठाम आहेत.
एकीकडे सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार समर्थकांत चढाओढ सुरू असतानाच आता स्वत: शिवकुमार यांनी सरकार पाडविण्याच्या षड्यंत्रावर केलेले भाष्य काय सूचवते? या षड्यंत्राची माहिती देतानाच काँग्रेस सरकार स्थिर आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे? त्यांच्या या वक्तव्यापाठोपाठ काँग्रेसमधील 30 हून अधिक असंतुष्ट आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी बदल्यांच्या बाबतीत आहे. एखादा सत्ताबदल झाल्यानंतर पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम, अबकारी, वनखाते आदी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या या ठरलेल्याच असतात. नव्या सरकारच्या पर्यायाने नव्या लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार काम करणारी यंत्रणा त्यांना हवी असते. त्यामुळे आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घाई आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळीच माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुमारे 500 कोटी रुपयांची उलाढाल केवळ महिनाभरात झाल्याचा आरोप सरकारवर केला होता. सरकारला घेरण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर निजदचा घरोबा होणार, हे जवळजवळ निश्चित आहे. 19 आमदारांच्या संख्याबळावर भाजपच्या मदतीने कुमारस्वामी यांनी विधिमंडळात सरकारला चांगलेच जेरीस आणले. आता त्यांच्या सिंगापूर दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी केलेला षड्यंत्राचा आरोप, त्यापाठोपाठ असंतुष्ट आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र, लगेच संसदीय पक्ष बैठकीचे आयोजन आदी घडामोडी लक्षात घेता काँग्रेसमध्येही सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट होते. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात अनेक जुन्या नेत्यांना संधी मिळाल्याने नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावे आणि कोणाला नाही, याचा निर्णय झाला आहे. आता नव्या मंत्र्यांची कार्यपद्धत, जुन्या आमदारांशी त्यांच्या बोलीचाली यावरूनच वातावरण तापले आहे.
मंत्रिपद तर मिळाले नाही, आमची कामेही होत नाहीत तर आम्ही करायचे काय? असा प्रश्न ज्येष्ठ नेत्यांना पडला आहे. उघडपणे नाराजी व्यक्त झाली नसली तरी आपल्याच पक्षाच्या आमदारांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही. एकीकडे पूर्ण बहुमत मिळूनही सरकारला अडचणीत आणण्यासाठी कोठे काही संधी मिळते का? याची वाट पाहणारे विरोधक तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ कधी संपतो आणि कधी एकदा मुख्यमंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडते? याच्या प्रतीक्षेत असलेले डी. के. शिवकुमार, दक्षिणेत निजदच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव करून काँग्रेसला आघाडी मिळवून देणारे डी. के. शिवकुमार यांची राजकीय कोंडी करण्यासाठी निजद नेत्यांचे सुरू असलेले प्रयत्न आदींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील या घडामोडींना महत्त्व आले आहे. म्हणून शिवकुमार यांनी एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर सरकार पाडविण्याचे षड्यंत्र सुरू आहे, असा थेट आरोप केला आहे.
एआयसीसीमध्ये भक्कम स्थान असणारे विधान परिषद सदस्य बी. के. हरिप्रसाद यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल, याची आशा होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यवस्थितपणे त्यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवले आहे. त्याची खदखद त्यांनी बेंगळूर येथील एका कार्यक्रमात बोलून दाखविली आहे. एखाद्याला मुख्यमंत्री बनविणेही येते आणि त्याला पायउतार करणेही जमते, असे सांगितले आहे. सिद्धरामय्या यांना उद्देशून त्यांनी केलेल्या वक्तव्याचेही कर्नाटकाच्या राजकारणात पडसाद उमटू लागले आहेत. हरिप्रसाद यांनी केलेल्या टीकेमुळे पक्षांतर्गत धूसफूस वाढली आहे. त्यामुळेच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार पाडविण्यासाठी सिंगापूरमध्ये षडयंत्र सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. सरकार पाडविण्याच्या फंदात आम्ही पडणार नाही, असे भाजप नेते उघडपणे सांगत असले तरी काँग्रेसमधील दोन शक्ती केंद्रांमुळे काय परिस्थिती निर्माण होते, याचा राजकीय फायदा उठवण्याची तयारी भाजपने केलेली नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.








