जि.पं. सीईओ राहुल शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आवाहन
बेळगाव : ‘जगभरातून प्लास्टिकचे प्रदूषण थांबवूया’ या 5 जून पर्यावरण दिनाच्या घोषवाक्यानुसार दि. 22 मेपासून सुरू झालेले अभियान 5 जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. ग्रामीण पिण्याचे पाणी विभागाचे संचालक तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ बेंगळूर यांच्यावतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम व त्याचे निर्मूलन करण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम व जागृती कार्यक्रम यामध्ये सर्व ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, युवक-महिला मंडळे, स्वसाहाय्य संघ, ग्रामीण पिण्याचे पाणी विभागाचे सदस्य व स्वयंसेवक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पंचायतचे सीईओ राहुल शिंदे यांनी केले आहे.
याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक निर्मूलन करून स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सर्व गावांना प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ग्राम पंचायतींनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व तालुके, ग्रामपंचायती यांनी हे अभियान यशस्वी करावे, असेही ते म्हणाले. या अभियानाचा एक भाग म्हणून प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे, हॉटेल, दुकाने, बेकरी या ठिकाणी ग्राहकांना प्लास्टिक रॅपरमधून पदार्थ दिले जातात का याची तपासणी करणे, जलस्त्रोतांची स्वच्छता करणे व नदी, नाले परिसरातील प्लास्टिक संकलित करणे असेही उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. दि. 22 मेपासून याची सुरुवात झाली आहे. दि. 5 जूनपर्यंत हे अभियान चालणार असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून ते यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.









