मडगाव पालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी खास काउंटरचे उद्घाटन
प्रतिनिधी /मडगाव
ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मडगावचे आमदार दिगंबर कामत केले. मडगाव पालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या खास काउंटरचे शुक्रवारी सायंकाळी उदघाटन केल्यानंतर ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करत होते. यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो तसेच अन्य नगरसेवक व ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आता पन्नाशीत असलेले येत्या दशकभरात ज्येष्ठ नागरिक बनतील. आज ना उद्या आपण सर्व ज्येष्ठ नागरिक बनणार असल्याने प्रत्येकाने जेष्ठ नागरिकांना मदत व आधार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे आमदार कामत यांनी यावेळी बोलतांना सांगितले. मडगाव पालिकेने याची दखल घेत ज्येष्ठांसाठी काउंटर सुरू केल्याने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेकडून त्यांच्यासाठी काउंटर खोलण्याचा प्रस्ताव आला होता. त्यावर आपण नगरसेवकांची अनौपचारिक बैठक बोलावून हा प्रस्ताव ठेवला असता सर्वांनी एकमताने त्यास होकार दिला. त्यामुळे हा काउंटर लगेच सुरू करणे शक्य झाले व याचे श्रेय सर्व नगरसेवकांना जाते, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आम्ही 23 रोजी सदर काउंटर खोलण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. त्यास नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी तत्परतेने मंजुरी देऊन तो सुरू केल्याने त्यांचे आम्ही आभारी आहोत, असे ज्येष्ठ नागरिक हर्षद नायक यांनी सांगितले. पालिकेने सदर काउंटर सुरू केला असला, तरी पालिकेच्या सर्व सोयी या काउंटरवरून मिळतील याची काळजी संबंधितांनी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.









