बिडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे अनावरण
वार्ताहर /नंदगड
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना, सर्वधर्मीयांना सोबत घेऊन आपले रयतेचे राज्य चालवले. म्हणूनच ते एक आदर्श राजे म्हणून नावारूपाला आले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही व आमचे राज्य सरकार सर्व लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवित असून या योजनांचा लाभ सर्व जातीधर्मियांना होतोय. गोरगरीब जनतेला होतो. शिवाजी महाराजांनी जो आपल्याला रस्ता दाखवला आहे. त्याचप्रमाणे आम्ही समाजकारणात व राजकारणात शिवाजी महाराजांप्रमाणेच मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केले. बिडी (ता. खानापूर) येथील लक्ष्मी चौकात छत्रपती शिवाजीराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे अनावरण माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिडी ग्रामदेवी पंचकमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन इनामदार होते. या कार्यक्रमाला बिडी ग्रा. पं. अध्यक्ष संतोष काशीलकर, हेस्कॉमचे अधिकारी मंजुनाथ बजंत्री, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष राजीव पेजोळी, बिडी येथील श्री साई व्यापारी संघाचे अध्यक्ष विठ्ठल मुळीक, हिंदवी स्वराज ग्रुपचे अध्यक्ष हणमंत पाटील, खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर कवळेकर, महादेव कोळी, महिला अध्यक्षा गीता अंबडगट्टी, काँग्रेसचे नेते रियाजअहमद पटेल, डॉ. जी. व्ही. जवळी यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामदेवी पंच कमिटीचे अध्यक्ष मंजुनाथ इनामदार यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांची शिवरायांबद्दल भाषणे झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.









