सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांचे आवाहन
वाळपई : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या 77 वर्षांमध्ये देशाने विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने विकासाच्या गतीवर मार्गक्रमण करत आहे. अशावेळी सर्व समाजातील घटकांनी एकसंघ राहून भारतातल्या उज्वल परंपरेचा घटक बनावा, असे आवाहन सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी केले. उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर तालुक्याचे मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार विष्णू राणे, गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांची उपस्थिती होती. भारत देश बलाढ्या होत आहे. अशावेळी जगातील अनेक देशाचे लक्ष भारताकडे केंद्रित झाले आहे. अनेक घटक आज भारतासमोर अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. अशावेळी सर्वांनी संघर्षाने व जिद्दीने पुढे येऊन सरकारच्या मागे खंबीरपणे उभे रहा, असे परब म्हणाले. सुऊवातीला प्रवीण परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या वाळपई हनुमान विद्यालय, युनिटी विद्यालय, अवर लेडी ऑफ लुर्डस विद्यालय यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सूत्रसंचालन शिक्षक हरीश कामत यांनी केले तर कर्मचारी गुरूदास गावस यांनी आभार मानले. यावेळी सरकारी कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









