प्रतिकिलो १ हजार रुपयाचा भाव
सावंतवाडी/प्रतिनिधी –
यंदा गावठी मिरच्यांच्या दराने कळस गाठला आहे. गावठी मिरच्यांचा दर प्रति किलो एक हजार रुपये झाला आहे. गतवर्षी हा दर चारशे रुपये होता. यंदा शेतकऱ्यानी गावठी मिरचीची लागवड केली.मात्र गावठी मिरचीला रोगाची लागण झाली. शेतकऱ्यांनी अनेक उपाय योजना केल्या. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे यंदा गावठी मिरचीचे उत्पादन कमी झाले. उत्पादन कमी झाल्याने गावठी मिरचीचा दर यंदा आकाशाला भिडला आहे.गावठी मिरची घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. गावठी मिरची कोकणात घरात वर्षभरासाठी केली जाते. त्या व्यतिरिक्त उत्पादित झालेली मिरची बाजारात विक्रीला नेली जाते. यंदा उत्पादन कमी झाल्याने कमी प्रमाणात मिरची बाजारात विक्रीला आली आहे.त्यामुळे आता मिरचीचे दर वाढले आहेत. यंदा गावठी मसाला दरवाढीमुळे आणखी तिखट भासणार आहे. यंदाच्या वर्षी बेडगी, काश्मिरी, लवंगी अशा घाटावरून येणाऱ्या मिरचीचे दरही वाढले आहेत. बेडगी मिरची तीनशेच्यावर आहे. अंन्य मिरच्यांचा दरही यंदा वाढला आहे. दर वर्षीच्या मानाने मिरच्यांचे दर दुप्पट झाले आहेत.त्यामुळे यंदा मसालाही महागणार आहे.