पीडित सहाय्य विभागाचा अहवाल सादर
पणजी : गेल्या नऊ वर्षांत दर आठवड्याला सरासरी पाच महिला आणि मुले गुह्यांचे बळी ठरले आहेत, असे राज्य सरकारच्या पीडित सहाय्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. पीडित सहाय्य विभागाने 2014 पासून 2,724 प्रकरणे हाताळली आहेत आणि त्यापैकी 70 टक्के प्रकरणे महिलांशी संबंधित आहेत. या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, गुह्याला बळी पडलेल्या मुलांपैकी जवळपास 50 टक्के मुले 1 ते 15 वयोगटातील आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हा अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की पीडितांचे लैंगिक, शारीरिक आणि शाब्दिक शोषण केले जाते. 2,724 प्रकरणांपैकी 1,931 महिला/मुली होत्या तर 793 मुले होती. बहुतेक प्रकरणे म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आहेत. पणजी 22.4 टक्के, जुने गोवे 11.5 टक्के, महिला पोलिसस्थानक 7.3 टक्के, तर पर्वरी पोलिसस्थानकातील 7.1 टक्के आहे.
जागृती सत्रांची आवश्यकता
लैंगिकता, मानवी विकास आणि कायदा याविषयी मुलांसाठी जागृती सत्रे आयोजित करण्याची नितांत गरज आहे. जागृतीबाबतची बहुतेक सत्रे फक्त मुलींसाठी आयोजित केली जातात, आणि मुलांना वगळले जाते. तसे न करता मुलांनाही अशा सत्रांची गरज आहे. दु:ख आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून प्रशिक्षित करण्याची तातडीची गरज आहे, असे पीडित सहाय्य विभागाचे प्रभारी एमिडिओ पिन्हो यांनी अहवालात म्हटले आहे.
उपनिरीक्षकाच्या नियुक्तीची शिफारस
या विभागामध्ये एका महिला उपनिरीक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. या विभागामध्ये पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे, जेणेकरून पोलिसांची मदत आणि वैद्यकीय तपासणीनंतर पुरावे गोळा करणे विनाविलंब करता येईल. असे पिन्हो म्हणाले.
एनजीओंची नोंदणी, पडताळणी व्हावी
महिला आणि बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांची नोंदणी करणे आवश्यक आहे. घरे आणि इतर सेवांमध्ये मुलांसोबत काम करणाऱ्या सर्व व्यक्तींची पोलिस पडताळणी अनिवार्य असावी. मुलांसोबत काम करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यास यामुळे मदत होईल. अशा संस्थांपासून गुन्हेगारांना दूर ठेवण्यास मदत होईल. सरकारने बालगृहात काम करण्राया इतर राज्यांतील कर्मचाऱ्यांचेही सर्वेक्षण करावे आणि पोलिसांकडून पडताळणी करावी, असेही या अहवालात नमूद केले आहे.









