फेब्रुवारी महिन्यातील उर्वरित तांदळाचे होणार वितरण
बेळगाव : राज्य सरकारने रेशनकार्डधारकांना माणसी 10 किलो तांदूळ दरमहा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा आदेश फेब्रुवारीपासून लागू झाला असला तरी बहुतांश दुकानदारांनी आदेश जारी होण्यापूर्वीच तांदळाची उचल केल्याने माणसी 5 किलोप्रमाणेच तांदळाचे वितरण करण्यात आले. त्यामुळे मार्च महिन्यात प्रतिमाणसी 10 किलो तांदळासह फेब्रुवारीतील 5 किलो असा एकूण 15 किलो तांदूळ मिळणार आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी अन्नभाग्य योजनेतून रेशनकार्डधारकांना माणसी 10 किलो तांदूळ दरमहा देण्याचे जाहीर केले होते.
केंद्राकडे तांदूळ पुरविण्यासाठी मागणी केली असता केंद्राने तांदूळ पुरवठा केला नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रेशनकार्डधारकांना माणसी 5 किलो तांदूळ तर अतिरिक्त 5 किलो तांदळाचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केले जात होते. मात्र पैसे देण्याऐवजी 10 किलो तांदूळच देण्यात यावेत, त्यामुळे रेशन दुकानचालकांना याचा लाभ होईल यासाठी राज्य सरकारकडे रेशन दुकानदार असोसिएशनने पाठपुरावा चालविला होता. अखेर आहार व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री एच. मुनियप्पा यांनी रेशनकार्डधारकांना अतिरिक्त पाच किलो तांदळाचे पैसे देण्याऐवजी 10 किलो तांदूळ देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत आदेश जारी होण्यापूर्वीच राज्यासह बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश दुकानदारांनी तांदळाची उचल केली होती. मात्र सदर निर्णय फेब्रुवारी महिन्यापासून लागू केल्याचे सरकारने जाहीर केले आहे. बेंगळूरसह काही जिल्ह्यांमध्ये 10 किलो तांदूळ वितरित केला आहे. ज्या दुकानदारांनी 5 किलो तांदूळ रेशनकार्डधारकांना दिला आहे, त्या कार्डधारकांना मार्च महिन्यात 10 किलो तांदळासह फेब्रुवारीतील उर्वरित 5 किलो असा एकूण माणसी 15 किलो तांदूळ मिळणार आहे, असे रेशन दुकानदार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष शेखर तळवार यांनी सांगितले.









