ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशातील प्रत्येक संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या लोकांना सामील केले आहे. मंत्रालयातही या लोकांचा हस्तक्षेप आहे. देशातील जवळपास सर्व यंत्रणा हे लोक चालवत आहे, असा आरोप काँगेस खा. राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी आज लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ते आपल्या स्थानिक नेत्यांना भेटणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला आपण विचारले तर ते सांगतील की, आम्ही आमचं मंत्रालय चालवत नसून RSS ने नियुक्त केलेले ओ.एस.डी आमचे मंत्रालय चालवत आहेत. केवळ मंत्रालय नाही तर देशातील प्रत्येक संस्था RSS चालवत आहे. राजकारणी देशात द्वेषाचे वातावरण तयार करत आहेत.
तुम्ही भारतात जा, तुम्हाला समजेल, की नागरिकांमध्ये एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे. भारतातील लोक विविधतेला खोलवर समजून घेतात. ही आपल्या देशाची ताकद आहे. लोकांमध्ये जाऊन खूप काही शिकायला मिळाले. आम्ही वेगवेगळ्या राज्यात गेलो. हजारो लोकांशी बोललो. देशातील प्रमुख प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षण यावर फारसे बोलले जात नाही. एकतर द्वेषाची चर्चा आहे किंवा ऐश्वर्या राय, शाहरुख खानची चर्चा आहे.