मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत आवाहन : घटक समित्यांच्या बैठका घेण्याचा निर्णय
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना रविवार दि. 1 जून रोजी हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत हा लढा सुरू ठेवावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी भाषिकाने त्या दिवशी हिंडलगा स्मारकाजवळ उपस्थित राहून श्रद्धांजली वाहावी व आपल्यातील एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले. शनिवारी मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. या बैठकीमध्ये 1 जून हुतात्मा दिन तसेच हुतात्मा स्मारकाचे बांधकाम याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. हुतात्मा दिनाच्या जागृतीसाठी बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्यातून घटक समित्यांच्या बैठका घ्याव्यात, अशी सूचना करण्यात आली. अॅड. एम. जी. पाटील यांनी हुतात्मा स्मारकाच्या बांधकामाची माहिती दिली. मालोजी अष्टेकर यांनी स्वागत केले. गोपाळ देसाई, मनोहर किणेकर, पियुष हावळ, निरंजन सरदेसाई, मनोहर संताजी यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रशासनाकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु, काही कानडी संघटनांनी याला विरोध करत प्रशासनाकडे तक्रार केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जागा मालकांना पत्र पाठवून बेकायदेशीररीत्या बांधकाम झाल्यास कारवाईचा इशारा दिला. त्याला म. ए. समितीनेही प्रत्युत्तर दिले. परंतु, हुतात्मा स्मारक होऊ नये, यासाठी कायदेशीर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, मराठी भाषिकांनी याविरोधात एकत्रित राहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
तज्ञ व उच्चाधिकार समितीची बैठक लवकरच
मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे काही मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यांनी ते मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर स्वाक्षऱ्या करून तज्ञ व उच्चाधिकार समितीची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासित केले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही समित्यांची बैठक होण्याची शक्यता असल्याचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी सांगितले. म. ए. समितीच्या बैठकीमध्ये दिवंगत पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी महापौर निलीमा चव्हाण, शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रकाश राऊत, रयत गल्ली येथील मोनाक्का पाटील, मंडोळी येथील बंडू आंबेवाडीकर, वाघवडे येथील मोहन पाटील, येळ्ळूर येथील जयराम घाडी व भरतकुमार मुरकुटे, राकसकोप येथील धनाजी पाटील, कौंदल येथील उदय भोसले, कंग्राळी खुर्द येथील कल्लाप्पा पाटील, चापगाव येथील शांता पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









