प्रतिनिधी /काणकोण
काणकोणचे पत्रकार जागृत असून त्यांनी नेहमी सत्याची कास धरावी, सत्ताधाऱयांच्या चुका जरूर दाखवाव्यात त्याच वेळी दुसरी बाजू देखील समजून घ्यावी असे मत काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी व्यक्त केले आहे. काणकोण पत्रकार संघाने आयोजित केलेल्या लो. टिळक पुण्यतिथी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रिबेलो उपस्थित होते.
चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत गावकर आणि ज्येष्ठ नागरिक नाटिविदाद डिसा सन्माननिय अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लो. टिळकांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
काही तांत्रिक अडचणीमुळे चावडीवरील मासळी मार्केटच्या दुरूस्तीचे काम रेंगाळले असले तरी लवकरच ते पूर्ण केले जाईल, त्याच प्रमाणे पालिका इमारत प्रकल्प पूर्ण झाल्यानतंर त्या प्रकल्पांत पत्रकार कक्षासाठी जागेची तरतुद केली जाईल असे श्री. रिबेलो यांनी स्पष्ट केले.
तलवारीपेक्षा पत्रकारांची लेखणी धारदार असून त्याचा वापर विधायक कामासाठी करावा. नवीन इमारत प्रकल्प पूर्ण होई पर्यंत पालिका सभागृहाच्या बाजूला असलेली एक खोली हंगामी तत्वावर पत्रकार कक्षासाठी देण्यात येईल असे यावेळी चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत ना. गावकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अजित पैगीणकर यांनी लो. टिळक आणि भारतकार हेगडे देसाई यांच्या पत्रकारितेविषयी बोलताना ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे. अशा व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा असे मत व्यक्त केले. पत्रकार सुभाष महाले यांनी काणकोणच्या दिवंगत पत्रकारांचे स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पत्रकार संघाचे अध्यक्ष बबेश बोरकर यांनी स्वागत करतानाच सद्याचा कार्यक्रम हा औपचारिक असून पंचायत निवडणुकीच्या आचार संहितेमुळे काही निर्बध आल्याचे स्पष्ट केले. संजय कोंमरपंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नाटिविदाद डिसा यांनी मत व्यक्त केले. देविदास गावकर, हरिश्चंद्र खोलकर, आबेल बार्रेटो, उल्हास गावकर, रेश्मी भंडारी, धिरज काणकोणकर हे सदस्य यावेळी उपस्थित होते. बेर्नाड फर्नाडिस यांनी शेवटी आभार मानले.









