पंतप्रधान मोदी यांचा सरन्यायाधीशांशी संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोमवारी सायंकाळी गवई यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनीच यासंबंधी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. ‘मी देशाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्याशी बोललो. आज सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापला असून नाराज आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे.’ असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ‘हल्ल्याच्या प्रकारानंतर सरन्यायाधीशांनी दाखविलेल्या शांतता आणि संयमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. ही भावना सरन्यायाधीशांच्या मूल्यांना आणि आपल्या संविधानाच्या भावनेला बळकटी देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.’ असेही ते पुढे म्हणाले.









