संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले ठाम प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालवलेले ‘सिंदूर अभियान’ हा केवळ एक ट्रेलर आहे. आवश्यकता भासल्यास दहशतवादाविरोधात आम्ही याहीपेक्षा कठोर कारवाई करणार आहोत. आम्ही आमची क्षमता ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून सिद्ध केली आहे. हे अभियान संपविण्यात आलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित केले आहे, कारण या अभियानाचा आतापर्यंतचा उद्देश सफल झालेला आहे, असे प्रतिपादन त्यांनी लखनौ येथे एका कार्यक्रमात केले.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आयोजित ब्राम्होस क्षेपणास्त्रांचा प्रथम संच शनिवारी त्यांच्या हस्ते सेनदलांना अर्पण करण्यात आला. या क्षेपणास्त्रांचे उत्पादन उत्तर प्रदेशमधील उत्पादन केंद्रात झाले आहे. या केंद्राची स्थापना केवळ चार महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. ‘सिंदूर अभियाना’त या क्षेपणास्त्राने भीमपराक्रम केला आहे. पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी त्या देशात कोठेही लपले तरी त्यांना टिपण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांची आहे, ही वस्तुस्थिती त्यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केली आहे.
वेग अन् अचूकता
वेग आणि अचूकता या दोन्ही निकषांवर हे क्षेपणास्त्र समर्थ ठरले आहे. ब्राम्होस व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम यंत्रणांपैकी एक ठरली आहे, ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. हे केवळ एक अस्त्र नसून आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या क्षमतेची ही एक पावती आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्र हे भारताच्या तीन्ही सेनादलांच्या मारक क्षमतेचे एक प्रतीक ठरले आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून आज या क्षेपणास्त्राकडे पाहिले जात आहे. भविष्यकाळात आम्ही याहीपेक्षा संहारक अस्त्रांची निर्मिती करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘ब्राम्होस एअरोस्पेस’
ब्राम्होस क्षेपणास्त्रांची निर्मिती ‘ब्राम्होस एअरोस्पेस’ या कंपनीकडून करण्यात येते नुकतेच या कंपनीने उत्तर प्रदेशात उत्पादन केंद्र स्थापन केले आहे. अत्यंत कमी वेळात कंपनीने या उत्पादन केंद्रातून ब्राम्होस क्षेपणास्त्रांचा प्रथम संच निर्माण केला आहे. या संचाच्या ‘फ्लॅगिंग ऑफ’ कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.









