कुरुंदवाड प्रतिनिधी
जनमताच्या आधारावरून विधवा प्रथा बंद हा कायदा अमलात आणण्यासाठी शासन दरबारी निश्चित प्रयत्न करणार असून हेरवाड ग्रामपंचायती प्रमाणे असा निर्णय प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतल्यास हा कायदा करण्यास सोईस्कर होणार आहे. त्यामुळे यासाठी सर्वच ग्रामपंचायतीनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत गावातील महिलांच्या विकासासाठी 11 लाखांचा निधी देणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी दिले.
हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून विधवा महिला प्रथा बंद करून घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाबद्दल शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे हेरवाड ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी या कौतुकास्पद निर्णयाबद्दल सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार नीलमताई गोऱ्हे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, विधवा महिलांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम सुरू आहे. मात्र, हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय सुवर्ण अक्षरांनी लिहण्याजोगा आहे आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज पर्यंत महिलांचा सन्मानच केलेला आहे. हा विधवा प्रथा बंदचा कायदा करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून याचा अभ्यास करून हा कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर हेरवाड ग्रामपंचायत प्रमाणे इतर ग्रामपंचायतींनीही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राजश्री शाहू महाराजांनी आपल्या समाजातील वंचित घटकांना न्याय दिला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त हेरवाड गावाने जपला आहे. राज्य मध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये या गावाने आदर्श निर्माण करून विधवा महिलांचा सन्मान केला आहे. कोरोना काळात तरुण मुलांना गमावण्याची वेळ सर्वांच्यावर आली आणि अनेक स्त्रियांना वैद्यत्व प्राप्त झाले. एकंदरीत स्त्रियांना समान वागणूक मिळण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल खरोखरच क्रांतिकारक आहे.
यावेळी लताताई गोरे यांचे मनोगत झाले. यावेळी स्त्री आधार केंद्रच्या प्रमुख नीलममताई जोशी, शिवसेना सांगली जिल्हा अध्यक्षा सुनिता मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, कोल्हापूर महिला जिल्हा प्रमुख मंगल चव्हाण, रविंद्र खेबुडकर, योगेश जाधव, नंदकुमार लोंढे, प्रविण सोनवणे, तहसिलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेरवाडला 50 लाखाचा निधी
विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला आहे या गावाच्या सर्वांगीण विकास करणे हे आपले ध्येय असून याच अनुषंगाने महिला भवन तसेच अन्य विकास कामासाठी 50 लाखाचा निधी आपण उपलब्ध करून देणार असल्याचे तालुक्याचे आमदार व आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी जाहीर केले