कृष्णात पुरेकर,कोल्हापूर
गेल्या काही महिन्यांपासून सीपीआर हॉस्पिटलमधील बाह्यारूग्ण विभागात शालेय विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे. यातील अधिकतर विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल अॅडिक्ट हेच कारण दिसून येत आहे. मानसोपचार विभागात रोज सरासरी 4 ते 5 विद्यार्थी येत असून त्यांच्यासह पालकांनाही येथे समुपदेशन केले जात आहे. काही मोबाईल अॅडिक्ट विद्यार्थी खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रतिदिन 10-12 विद्यार्थी मोबाईल अॅडिक्टची शिकार बनत असल्याने पालकांसह शैक्षणिक वर्तुळासमोरही आव्हान उभे आहे.
गेल्या 20 वर्षांतील मोबाईल क्रांतीने जग प्रत्येकाच्या हातात सामावले आहे. आता तर मोबाईल नसलेला माणूस अशिक्षित मानला जात आहे. कोरोना काळात तर शाळा बंद झाल्या. परिणामी, दीड-दोन वर्षे ऑनलाईन एज्युकेशनचा फंडा घरोघरी पोहोचला. त्याचा फायदाही विद्यार्थी, पालकांना झाला. कोरोनाची साथ कमी झाली. शाळा पुन्हा सुरू झाल्या, ऑनलाईन शिक्षण ऑफलाईन झाले. पण कोरोना काळात ‘ऑनलाईन’च्या निमित्ताने लागलेले मोबाईलचे वेड वाढत गेले, अन् कोरोनानंतर त्याचे दुष्परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत.
मोबाईलमधील विविध गेम्स, ऑनलाईन गेम्सनी अनेक विद्यार्थ्यांचा बळी घेतला. ‘पब्जी’ने तर अनेकांना उद्ध्वस्त केले. ऑनलाईन गेम्समध्ये काही विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या फसले, त्यामुळे पालकांनाही आर्थिक फटका बसला. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी महागडे अॅड्राईड मोबाईल घेतले. मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत असताना कधी मुलांना मोबाईलचे व्यसन लागले, ती मोबाईल अॅडिक्ट बनली, हे पालकांनाही समजले नाही. परिणामी मुले शिक्षण, अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल गेम्समध्ये तासनतास अडकून गेली.
मोबाईलवर सतत गेम्स खेळल्याने, त्यातही एखाद्या स्थितीत तो पहात राहिल्याने मुलांमध्ये मान, हात, पाठदुखी, डोकेदुखी, डोळेदुखीची लक्षणे दिसू लागली. काही पालकांनी स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर तात्पुरते उपचार केले. काहींनी मुलांचे डोळे तपासून चष्मेही बनवून घेतले. पण तरीही मुलांचे मोबाईल पाहणे सुरूच राहिले. गेल्या काही महिन्यांत मोबाईलवरून कुटुंबात वाढलेले वाद, मुलांची वाढलेली चिडचिड, कमालीचा संताप, अभ्यासाकडे झालेले दुर्लक्ष, भीती, आत्मविश्वास गमावणे अन् लक्ष लागत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत, अन् त्यातूनच पालक मुलांसाठी मानसोपचाराकडे वळले आहेत.
सीपीआर हॉस्पिटलमधील ओपीडीतील नेत्र, आर्थोपेडीक, बालरोग विभागासह मानसोपचार कक्षात शालेय विद्यार्थ्यांची पालकांसह गर्दी वाढत आहे. मानसोपचार विभागात रोज 4-5 विद्यार्थी तपासणीसाठी येत आहेत. त्यांची तपासणी करून पालकांना 10 दिवस, 20 दिवस, असे सहा महिन्यांसाठी टप्प्याटप्प्याने समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनात मोबाईल अॅडिक्ट विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती मानसोपचार तज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी दिली.
मुलांचा स्क्रिन टाईम कमी करा, त्यांना मोबाईलपासून दूर ठेवा : डॉ. पवन खोत
जिल्ह्यात मोबाईल अॅडिक्ट विद्यार्थ्यांचे प्रमाण 5 ते 10 टक्के आहे. ते वाढतच आहे. मानसोपचारातून 90 टक्के विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. मोबाईल अॅडिक्टपासून पाल्याला वाचवण्यासाठी त्याचा स्क्रिन टाईम कमी करा. त्यावर नियंत्रण आणा. जास्तीत जास्त मैदानी खेळावर भर द्या. मुलांशी पालकांनी संवाद वाढवावा, असे आवाहन सीपीआर हॉस्पिटलमधील मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. पवन खोत यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









