कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
गेल्या काही वर्षापासून ध्वनी प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. शहरापासून लहान खेडयातही सण– उत्सव आणि इव्हेंटमध्ये कानाचे पडदे फाटतील अशा ध्वनीक्षेपकाचा वापर वाढला आहे. यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. याबरोबरच मोठया आवाजाचे फटाके फोडले जात असल्यामुळेही ध्वनी प्रदूषण होत आहे. शासन– प्रशासनाकडून या प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी कायदे करण्यात आले आहेत. पण या कायद्यांची कडक अंमलबजावणी होत नाही. प्रशासकीय यंत्रणेकडील अपुरे मनुष्यबळ आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे ध्वनी प्रदूषण थांबवण्यात अपयश येत आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण रोखणे सर्वांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभाग आणि पर्यावरणाच्या विषयावर काम करणाऱ्या संस्थांकडून दरवर्षी सण– उत्सव आणि इव्हेंटमध्ये लावण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकातून बाहेर पडणाऱ्या आवाजाची पातळी मोजली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव, दिवाळी सणात फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाची पातळी घेतली जाते.याचबरोबर अन्य वेळी साजरा करण्यात येणाऱ्या इव्हेंटमधील आवाजाची पातळी मोजली जाते. प्रत्येक वेळी आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा वाढून कायद्याचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे. इतकेच काय शहरामध्ये काही शांतता क्षेत्रे आहेत. या क्षेत्रातसुध्दा आवाजाची पातळी ओलांडली गेली आहे. या उच्चतम आवाजाचा कोल्हापुरातील अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. अनेकांच्या कानाच्या पडद्यावर परिणाम झाला असून ऐकू येणे कायमचे बंद झाले आहे. डॉल्बीच्या आवाजाने जुनी बांधकामे पडली आहेत.यामुळे ध्वनीप्रदूषण सुध्दा समाजासमोर गंभीर समस्या बनत आहे. यासाठीही नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.
- वाहनांचा कर्णकर्कश आवाज
काही वाहनांचे हॉर्न कर्णकर्कश आहेत.तसेच बुलेट आणि काही महागडया दुचाकींचा आवाज पादचाऱ्यांना धडकी भरायला लावणारा आहे.निवडणूक तसेच काही इव्हेंटमध्ये दुचाकींचे सायलन्सर काढून रॅली काढली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी टवाळखोर कारण नसताना शहरातील काही रस्त्यावर दुचाकीवर फिरत ध्वनी प्रदूषण करतात. काही दिवसापूर्वी कोल्हापुर पोलीसांनी अशा वाहनांच्या सायलेन्सरवर रोडरोलर फिरवला. तेव्हापासून अशा दुचाकींचा आवाज कमी झाला आहे. पण हा आवाज कायमचा बंद होण्यासाठी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.
- शहरात आवाजाची पातळी कायमच–
आरोग्य संघटनेच्या मानकानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने आवाजाची पातळी कुठे किती,रात्री दिवसा किती असावी याचे नियम दिले आहेत.पण कोल्हापुर शहरात कुठेच त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.शांतता क्षेत्र असलेल्या ठिकाणी सुध्दा वाहनांचा मोठा गोंगाट असतो.तर सण उत्सव असले की त्यामध्ये आणखी भर पडते.काही हॉस्पीटल रस्त्याच्या लागूनच आहेत.यामुळे शहरात सर्वत्र आवाजाची पातळी कायम आहे.
डॉ.आसावरी जाधव–पर्यावरण विभाग प्रमुख–शिवाजी विद्यापीठ
- दिवाळी सणात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणाने विभागाने घेतलेल्या डेसीबलचे प्रमाण
क्षेत्र क्षेत्राचे नाव 2024 ध्वनी पातळी
रहिवासी क्षेत्र उत्तरेश्वर पेठ 80.7
ताराबाई पार्क 79.
शिवाजी पेठ 80.3
नागाळा पार्क 76.9
मंगळवार पेठ 83.2
राजारामपुरी 74.6
व्यावसायिक क्षेत्र राजारापुरी 69.7
शाहुपुरी 70.2
लक्ष्मीपुरी 87.4
महाव्दार रोड 86.4
गुजरी कॉर्नर 87.5
पापाची तिकटी 78.5
बिनखांबी गणेश मंदिर 72.6
मिरजकर तिकटी 76.7
गंगावेश 78.2
बिंदू चौक 75.5
शांत (सायलेंट)क्षेत्र
सीपीआर 63.9
कोर्ट 56.6
जिल्हाधिकारी कार्यालय 56.6
शिवाजी विद्यापीठ 66.6
औद्योगिक क्षेत्र
वाय. पी. पवार नगर 74.6
उद्यम नगर 73.3








