खेड / राजू चव्हाण :
गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशभक्त बुधवारपासून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. गणेशभक्तांनी रेल्वेस्थानके हाऊसफुल्ल झाली आहेत. रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांची कुमक त्या-त्या स्थानकात तैनात करण्यात आली आहे. ‘सिंगल ट्रॅक आणि गणपती स्पेशलच्या फेऱ्या अनेक’ यामुळे परतीच्या प्रवासातही रखडपट्टी अन् रेटारेटीच्या प्रवासाचे ‘विघ्न’ उभे ठाकले आहे. पहिल्या दिवशी मुंबई-ठोकूर गणपती स्पेशल ५ तास उशिराने धावली. अन्य १० रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला.
महामार्गावरील खड्ड्यांतून कसरतीचा प्रवास करण्याऐवजी गणेशभक्त रेल्वेगाड्यांतूनच रेटारेटीचा अन् लोंबकळत प्रवास करत मुंबई गाठण्यास पसंती देत आहे. गणेशभक्तांच्या रेलचेलीने कोकण मार्गावरील सर्वच रेल्वेस्थानके गजबजली आहेत. कोकण मार्गावरुन धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल विक्रमी गर्दीनेच मार्गस्थ होत आहेत. त्या-त्या स्थानकात दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जागा मिळवताना गणेशभक्तांची अक्षरशः चढाओढ सुरू झाली आहे. बऱ्याचवेळा स्थानकात दाखल होणाऱ्या गाड्यांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने तासन्तास स्थानकात तिष्ठत बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
- स्थानिक पोलिसांची साथ
या पार्श्वभूमीवर स्थानकात तैनात रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये चढण्याची मुभा दिली जात आहे. यामुळे गणेशभक्तांना मिळाला असून इच्छितस्थळ गाठणे सोयीचे ठरत आहे. रेल्वेस्थानकांवर उसळलेल्या गर्दीमुळे कोकण रेल्वे प्रशासनही सतर्क झाले असून प्रवाशांना ध्वनीवर्धकाद्वारे सतर्कतेच्या सूचनाही दिल्या जात आहेत.
- आजही धावणार खेड-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल
परतीला निघालेल्या गणेशभक्तांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड-दिवा अनारक्षित मेमू स्पेशलमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बुधवारी धावलेल्या फेरीला प्रवाशांनी विक्रमी गर्दी केली. ४ सप्टेंबर रोजी खेड-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल धावणार आहे. सकाळी ८ वाजता येथील स्थानकातून सुटणारी स्पेशल त्याचदिवशी दुपारी १ वाजता दिवा येथे पोहचेल.








