शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : लवकरात लवकर गणवेश वितरण करा : विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना होत आला तरी अद्याप विद्यार्थ्यांना शालेय गणवेश सरकारकडून पुरविण्यात आलेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना मागील वषीचा जुना गणवेश घालून शाळांमध्ये यावे लागत आहे. अनेकांचे गणवेश खराब झाले असल्याने एकतर नवीन खरेदी करणे अथवा दुसरा डेस घालण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे शिक्षण विभाग केव्हा गणवेशांचे वितरण करणार हे पहावे लागणार आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे शालेय गणवेशाचे वितरण सरकारने बंद ठेवले होते. यावषी नियमित पद्धतीने वर्ग भरल्याने सरकारने गणवेश वितरणाची घोषणा केली होती. तथापि 16 मे पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. परंतु अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आलेले नाहीत.
सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना शर्ट व हाफ पॅन्ट दिली जाते. तर आणखी एक जोड एसडीएमसी व मुख्याध्यापकांच्या सहयोगातून दिला जातो. शाळा सुरू झाल्याबरोबरच गणवेश मिळणे आवश्यक असतानाही महिना झाला तरी अद्याप गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकतर जुने गणवेश घालून अथवा गणवेशाविना शाळांमध्ये जावे लागत आहे. तरी लवकरात लवकर गणवेश मिळवून देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.
शिक्षकांकडे गणवेशासाठी विचारणा
शहर शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी उषाताई गोगटे हायस्कूलमध्ये घेतलेल्या बैठकीत गणवेश लवकर दिले जातील, असे सांगितले. परंतु यासाठी अद्यापतरी कोणत्याही हालचाली शिक्षण विभागाकडून झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे पालकांकडून शालेय शिक्षकांकडे गणवेशासाठी विचारणा केली जात आहे.









