’स्मार्ट सिटी’ कामांचा सावळागोंधळ सुरूच : 15 मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याची होती मुदत

पणजी : राज्यात येत्या दि. 17 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या जी20 शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीत चालणारी कामे 15 मार्च पर्यंत संपविण्यासंबंधी विविध कंत्राटदारांना दिलेली ’डेडलाईन’ आज संपत असली तरी अर्धीअधिक कामे अद्याप पूर्ण होणे शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. स्मार्ट सिटीची कामे हाती घेतल्यापासून पणजी शहराची रयाच गेली आहे. संपूर्ण शहराला एखाद्या खाण परिसराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर काहींच्या मते पणजीची स्थिती एखाद्या भिषण भूकंपानंतर होणाऱ्या दैनावस्थेसारखी झालेली आहे. धुळ प्रदूषणामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. हृदयरोग, दमा, धूळ अॅलर्जी यासारखे आजार असलेल्या वयोवृद्धांचे तर पार हाल झाले आहेत. त्यातून राजधानीत प्रत्येक दवाखान्यात आजारी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. भरीस गेल्या कित्येक दिवसांपासून लोकांमध्ये कोरोनाचा दुसरा अवतार समजल्या जाणाऱ्या इन्फ्लुएन्झा सारख्या आजाराची लक्षणे दिसून येऊ लागल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. राजधानीतील खोदकामांचे हे परिणाम असल्याचे लोक बोलू लागले आहेत.

शहरात सध्या मलनिस्सारण वाहिनी, स्मार्ट रस्ते यासारखी कित्येक कामे एकाचवेळी सुरू आहेत. त्यातून कोणता कंत्राटदार कोणते काम करतो याचासुद्धा अंदाज येत नाही. त्यातून सगळाच सावळागोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या कामांसाठी चाललेली धिसाडघाई पाहता, त्यांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात येऊ लागली आहे. ही कामे पूर्णत्वास येईपर्यंत आतापर्यंतच सुमारे 6 ट्रक विविध ठिकाणी खड्ड्यात कोसळले आहेत. त्यावरून लोकांच्या शंकेला पुष्टी मिळत आहे. या कामांच्या दर्जाबाबत शंका घेण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यासाठी वापरण्यात येणारे निम्न दर्जाचे बांधकाम साहित्य असून रेतीच्या जागी चक्क ’मुरास’ वापरण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. ही मुरास म्हणजे क्रशरवर खडी फोडताना निर्माण झालेला टाकाऊ भुसा असून रेती म्हणून त्याचा वापर होणे कदापी शक्य नाही, अशी माहिती अनेक प्रख्यात बांधकाम कंत्राटदार/व्यावसायिकांनी दिली आहे. त्यावरून ही कामे दर्जेदार बनतील कि सुमार दर्जाची असतील, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. सध्या स्माट सिटीची बहुतेक कामे ही ’सरकारी जावई’ असल्याची सतत टीका होणाऱ्या कंत्राटदारालाच देण्यात आली असून त्याच्या बांधकाम दर्जाचा यापूर्वी लोकांनी भरपूर अनुभव घेतलेला आहे. त्यावरून स्मार्ट सिटी कामांच्या दर्जाचाही लोक अंदाज बांधत असून येत्या पावसाळ्यातच त्याची प्रचीती येणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.









