सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षण 85 टक्के पूर्ण
बेळगाव : मागासवर्गीय आयोगाकडून सुरू करण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण शनिवार दि. 18 रोजी पूर्ण झाले आहे. मात्र, जिल्ह्यात केवळ 85 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून शेवटच्या क्षणापर्यंत सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्यात आले. मात्र, जिल्हा प्रशासनाला लक्ष्य साध्य करता आले नाही. 22 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणात सर्वप्रथम घरांची ओळख पटविण्यात आली. तर यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. हळूहळू त्यात सुधारणा करण्यात आल्याने शिक्षकांना याकामी अन्य काही सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागली. जिल्ह्यात अंदाजे 11.80 लाख घरे निश्चित करण्यात आली. त्या घरांना हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी वीज मीटर, आरआर क्रमांकावर आधारित युएचआयडी कार्ड चिकटवले होते. या आधारे सर्वेक्षणकर्त्याला दीडशे ते दोनशे घरे देण्यात आली. एकूण 10 हजार 803 सर्वेक्षणकर्त्यांनी हे काम केले. जिल्ह्यात 11 लाख 76 हजार 502 घरे आणि 57,00433 लोकसंख्या ओळखण्यात आली आहे. शनिवार दि. 18 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दहा लाखांहून अधिक घरांपर्यंत पोहोचलेल्या सर्वेक्षकांनी 47 लाख 63 हजार 534 लोकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हे प्रमाण 84.59 टक्के इतके झाले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत बेळगाव जिल्हा राज्यात 23 व्या क्रमांकावर आहे. तर 94 हजारांहून अधिक लोकांची गणती शिल्लक राहिली आहे.









