अनगोळ नाका ते दुसरे रेल्वेगेट रस्त्यावरील प्रकार
बेळगाव : अनगोळ नाका ते टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट रस्त्यापर्यंत नवीन पथदीप बसविण्यात आले. परंतु, अद्याप ते सुरू करण्यात आले नसल्याने परिसर अंधारात आहे. यामुळे वाहनचालकांचे अपघात घडत असून, परिसरातील विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी पथदीप सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी हेरवाडकर स्कूलपासून अनगोळ नाक्यापर्यंत पथदीपांसाठी काँक्रिट घालण्यात आले. त्यानंतर त्यावर डेकोरेटिव्ह पोल उभे करण्यात आले. परंतु, अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाहीत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप या पथदीपांना वीजकनेक्शन देण्यात आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. पथदीप नसल्यामुळे रात्रीच्या वेळी व्यवसाय करणे अवघड होत आहे. या रस्त्यावरून ये-जा करणारी वर्दळ वाढली असतानाही पथदीप नसल्यामुळे अपघात होत आहेत.
दुर्घटना घडण्यापूर्वी पथदीप बसवा
पथदीप बसविण्यासाठी विलंब होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक वेळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. त्यामुळे हा रस्ता अंधारात असून, एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने पथदीप बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









