शेतकरी आता मान्सूनच्या प्रतीक्षेत
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील जीवनदायींनी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेय नदी जून महिना अर्धा संपत आला तरी अद्याप कोरडीच असल्याने शेतकरी वर्गासह नदी प्रवाहित होण्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चालू वर्षी समाधानकारक पाऊस पडण्याचे वर्तविण्यात आले होते. मे महिन्यात मान्सूनपूर्व वळीव पाऊस जोरदार झाला. खरीप हंगामातील शेती मशागत तसेच पेरणीच्या हंगामाला चालना मिळाली. मात्र अद्याप मान्सूनने या भागात म्हणावा तसा अद्याप जोर न धरल्याने नदी, नाले कोरडेच आहेत.
मेमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे विहिरींतील पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. मात्र जोरदार मुसळधार वृष्टी आणि मान्सून कार्यरत झाल्याशिवाय नदी, नाले, तलाव, विहिरीतील पाण्याची पातळी पूर्णपणे वरती येणार नाही. याचबरोबर जर मार्कंडेय नदीप्रवाहीत झाली तरच या विहिरींतील पाण्याची पातळी वाढू शकते. मात्र अद्याप मान्सून म्हणावा तसा सक्रिय नाही. परिणामी मार्कंडे नदीचे पात्र अद्याप कोरडेच दिसून येत आहे.
या भागात रताळी, बटाटे, भुईमूग, मिरची, नाचणा, कुळीथ, सूर्यफूल याबरोबरच इतर भाजीपाला पिके घेतली जातात. मान्सून वेळेवर सक्रिय झाला तरच सदर पिकांच्या बियाणांची पेरणी वेळेत होऊन पिके हाती मिळतात. पात्रात येणारे पाणी माळ जमिनीतील पिकांनाही पुरवले जाते. मात्र सध्या मान्सूनच कार्यरत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आता सर्वांच्या नजरा मान्सून पावसाकडे लागल्या आहेत.









